संप चिघळण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न ! – अनिल परब, परिवहनमंत्री

अनिल परब, परिवहनमंत्री

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप चिघळावा, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत, असा आरोप परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला असून ‘संप मागे घ्यावा’, असे आवाहनही केले आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे समिती जो अहवाल देईल, तो सर्वांना लागू असेल. वेतनवृद्धीची (इन्क्रिमेंटची) मागणी वगळता परिवहन विभागाकडील मागण्या मान्य झाल्या आहेत. या संपाचे कामगार राजकीय बळी ठरले, तर ते दुर्दैवी असेल. संप चालू राहिला, तर महामंडळाची पुष्कळ हानी होईल. विलीनीकरणाची मागणी २-४ दिवसांत पूर्ण होणार नाही. त्यासाठी वेळ लागेल. आत्महत्या हा पर्याय नाही. कर्मचार्‍यांनी साथ दिली, तर राज्य परिवहन महामंडळाला पूर्वीचे दिवस येतील. काही कर्मचार्‍यांना कामावर रुजू व्हायचे आहे; परंतु भाजपचे कार्यकर्ते त्यांना कामावर येऊ देत नाहीत. कामावर येऊ इच्छिणार्‍या कर्मचार्‍यांना संरक्षण दिले जाईल.’’

अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थाबाहेर आंदोलन करणार्‍या महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना पोलिसांनी कह्यात घेऊन आझाद मैदानावर नेले. यामध्ये महिलांचा सहभाग होता.