संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद !

नवाब मलिक यांच्याविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

संभाजीनगर – अमली पदार्थविरोधी विभागाचे (एन्.सी.बी.) संचालक समीर वानखेडे यांच्या येथील आत्या गुंफाबाई भालेराव यांनी राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ‘ॲट्रॉसिटी’ची मुकुंदवाडी येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीत नवाब मलिक यांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानुसार ९ नोव्हेंबर या दिवशी नवाब मलिक यांच्याविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी ‘समीर वानखेडे हे मुसलमान असून त्यांनी मुसलमान असल्याचे लपवून नोकरीसाठी कागदपत्रांचा अपवापर केला आहे’, असा आरोप केला होता. हे आरोप समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी फेटाळून लावले होते. गुंफाबाई भालेराव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मी आणि माझा भाचा समीर वानखेडे हे एकत्र कुटुंबाचे सदस्य असून दोघेही महार (नवबौद्ध) जातीचे आहोत. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली होती. आर्यन खान याला कह्यात घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबांच्या जातीविषयी यांनी खोटी माहिती पसरवली, तसेच समीर यांची नोकरी जाऊन त्यांना अटक होईल, अशा धमक्याही दिल्या आहेत.  मलिक यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.