आज देशात होणार्या ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणा’साठी महाराष्ट्रातील ७ सहस्र ३३० शाळांची निवड !
संभाजीनगर – केंद्रीय शिक्षण विभागाने देशव्यापी ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण’ (नॅशनल अचिव्हमेंट्स सर्व्हे २०२१) करण्याचा निर्णय घेतला असून हे सर्वेक्षण देशभरात येत्या १२ नोव्हेंबर या दिवशी करण्यात येणार आहे. या देशव्यापी सर्वेक्षणासाठी राज्यातील ७ सहस्र ३३० शाळांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील एकूण २ लाख ३४ सहस्र ५५ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत.
या राष्ट्रीय सर्वेक्षणासाठी शाळा आणि विद्यार्थी यांची निवड इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या तुकड्यांमधून केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. ‘विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील संपादणुकीचे मूल्यांकन करणे आणि देशाच्या शिक्षणप्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करणे’, या हेतूने हे सर्वेक्षण होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. या सर्वेक्षणाचे अहवाल जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सिद्ध करण्यात येणार आहेत.
सर्वेक्षणासाठी संभाजीनगर २२८, नगर २२३, अमरावती २०४, जळगाव २०९, नाशिक २३१, सोलापूर १६२, नागपूर २३२, पुणे २३४ आणि मुंबईत २९२ शाळांची निवड करण्यात आली आहे. सर्वेक्षणात राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. शासकीय, खासगी, अनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित सर्व शाळांचे प्रतिनिधित्व यामध्ये आहे. एकूण ११ सहस्र २८९ क्षेत्रीय अन्वेषक नेमण्यात आले आहेत.