चीनमधील मांचू, भारतातील इस्लामी राजवट आणि हिंदी राष्ट्रवाद !

‘चीनच्या उत्तरेकडील मांचुरिया प्रदेशातील मांचू लोकांनी वर्ष १६४४ मध्ये संपूर्ण चीनवर वर्चस्व मिळवले. मांचूंनी वर्ष १९१२ पर्यंत चीनवर राज्य केले. चीनमध्ये वर्ष १९११ मध्ये क्रांती झाली आणि चँग-के-शेक हा चिनी नेता काही वर्षांनी राज्यावर आला. माओ-त्से-तुंगने वर्ष १९४९ मध्ये त्यास पराभूत केले. तेव्हापासून कम्युनिस्टांची सत्ता चीनवर आहे. चीनने राष्ट्रवादाचा त्याग न करता मांचू लोकांनाच चिनी राष्ट्रवादाचा स्वीकार करण्यास भाग पाडले. दुसरीकडे भारतातील हिंदी राष्ट्रवाद्यांना मोगली राजवटीचे स्वाभिमान प्रतिनिधीत्व करणार्‍या इस्लामी मनोवृत्तीचा बीमोड करणे न जमल्याने आधी त्यांचे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र (पाकिस्तान) निर्माण करून देऊन मग स्वतःस स्वतंत्र होता आले. आजही इस्लामी राक्षसी महत्त्वाकांक्षेला आवर घालण्यात हिंदी राज्यकर्त्यांना यश आलेले नाही. मांचू लोकांचा वेगळा राष्ट्रवाद अशी समस्या चीनसमोर नाही. भारतासमोरील सर्वांत मोठा प्रश्न इस्लामी आतंकवादाचा भस्मासूर हाच आहे.

१. मांचू आणि मुसलमान

‘आपण अन्य चिन्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत’, हा अभिमान मांचूंनी कधी सोडला नाही. तथापि ‘चिनी संस्कृतीचा स्वीकार केल्यावाचून चीनवर राज्य करता येणार नाही’, हे त्यांनी ओळखले नि तसे धोरण ठेवले. भारतात मात्र हिंदी संस्कृतीचा नाश करणे हे उद्दिष्ट मुसलमानांनी प्रारंभापासून आजपर्यंत हृदयाशी घट्ट धरून ठेवले.

२. मोगल काळात भारतात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या मूर्तींचा मशिदींच्या पायर्‍यांसाठी उपयोग !

मांचू राजवटीने ‘कन्फ्यूशस’ या चिनी विचारवंताच्या प्रणालीचा आदर केला. सम्राटपद सोडल्यास अन्य कोणत्याही स्थानावर गुणवत्तेनुसार मांड बसवण्याची संधी चिन्यांना दिली. भारतात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या मूर्तींचा मशिदींच्या पायर्‍यांसाठी उपयोग झाला. अकबराच्या काळातही हिंदूंना दुय्यम श्रेणीतील मानावर समाधान मानावे लागले. ‘कन्फ्यूशस’च्या समाजव्यवस्थेत त्यांनी पालट केला नाही. समृद्धी आणली. कालांतराने प्रशासन सुस्तावले आणि ब्रिटिशांच्या धूर्ततेपुढे टिकू शकले नाही. येथे लक्षात घेण्यासारखी दोन सूत्रे आहेत. ती म्हणजे अवघ्या ३ पिढ्यांत मांचूंनी अजस्त्र चीनवर स्वतःची पकड बसवली.

३. चीनच्या भीतीच्या सावटाखाली असलेला भारत !

चिनी समाजात १७ व्या शतकात अंतर्गत दोष होते. त्यामुळे तो पारतंत्र्यात गेला; परंतु ते दोष दूर करून स्वतंत्र होऊन जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने चीन निर्धाराने वाटचाल करू लागला. चीनच्या समाजव्यवस्थेमध्ये साडेतीनशे वर्षांपूर्वी व्यापारी आणि सैनिकी पेशाचे लोक यांना अत्यंत खालचे आणि उपेक्षेचे स्थान होते. या दोन्ही विषयांत आज चीन भारताच्या पुढे आहे. आजचा चीन माओला मागे टाकून खुल्या अर्थव्यवस्थेचा देशहिताला अनुकूल तेवढ्या प्रमाणात स्वीकार करून व्यापारात अमेरिकेची बरोबरी करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. चीनने वर्ष १९६२ च्या युद्धात बळकावलेला ३६ सहस्र चौरस मैलाचा प्रदेश परत मिळवण्याची इच्छाही भारताला होत नाही. म्हणजे सैनिक वर्चस्वाची चीनची भीती भारतापुढे आहे.

४. ख्रिस्ती धर्मप्रचारकांची कारस्थाने

चीनच्या प्रचंड लोकसंख्येमुळे ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे लक्ष त्या देशाकडे ७ व्या शतकापासून होते. १७ व्या शतकात युरोपचे व्यापारी आले. त्यांच्यापासून पृथ्वीचा आकार केवढा आहे, हे चीनला कळले; परंतु सर्वच परदेशी व्यापार्‍यांशी चीन अत्यंत निष्ठूरपणे वागे आणि त्यांना पाय रोवू देत नसे. १८ व्या शतकात इंग्रजांनी चीनमध्ये भारतात निर्माण होणारे अफूचे पीक विकायला आरंभ केला. १९ व्या शतकात संपूर्ण चीन अफूच्या अधीन झालेला पहावयास मिळाला. ब्रिटीश व्यापार्‍यांना पकडून आणि त्यांच्याकडील अफू जप्त करून जाळून चिनी नागरिकांचे अधःपतन रोखण्याचा प्रयत्न मांचू सरकारने केला. त्यातून वर्ष १८३९ ते ४२ या काळात ब्रिटन विरुद्ध चीन, असे पहिले अफू युद्ध होऊन चीनचा पराभव झाला. परिणामी मोठ्या प्रमाणावर चीनची अंतर्गत बाजारपेठ ब्रिटिशांना उघडी झाली. ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या चिथावणीने २० वर्षांनी दुसरे ‘अफू युद्ध’ झाले. पुन्हा चीन पराभूत झाला. ख्रिस्ती धर्मप्रसारावरील बंधने उठली. त्यापेक्षा भयंकर म्हणजे चीनला ब्रिटनच्या जोडीला फ्रान्स, अमेरिका, रशिया इत्यादी अनेक राष्ट्रांना त्याचे भूभाग तोडून द्यावे लागले. तेथे या परकी सत्तांनी स्वतःची न्याययंत्रणा उभी केली. चीनचे सार्वभौमत्व अत्यंत संकुचित झाले.

५. ‘हिंदी राष्ट्रवादा’ची अफू !

चीनने त्याचे सामर्थ्य आज परत मिळवले आहे. संपूर्ण युरोप चीनविरुद्ध कारस्थाने करत होता. त्यांना तो पुरून उरला. आपल्याकडे ब्रिटनने दुसर्‍या युरोपीय राष्ट्रांना ढवळाढवळ करू दिली नाही; मात्र ब्रिटनइतकाच इस्लामी मनोवृत्तीचा धोका होता. त्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या काँग्रेसने ‘हिंदी राष्ट्रवादा’ची जी अफू पाजली, तिची नशा अजून उतरलेली नाही. दारूच्या गुत्त्यासमोर निदर्शने करण्याचे कार्यक्रम आम्हाला दिले गेले. ते करून आम्ही देशभक्त म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात ‘निवृत्ती वेतन’ घेण्यास मोकळे झालो.

६. चिन्यांचा ख्रिस्ती मिशनरींना सैन्य संघटनाद्वारे विरोध

भारतात वर्ष १८५७ चे स्वातंत्र्यसमर घडले. चीनमध्ये वर्ष १८५० ते १८६४ या काळात जो उठाव झाला, तो ‘तायपिंग बंड’ म्हणून प्रसिद्ध आहे. चीनमधील स्वतः ख्रिस्ती झालेल्या आणि ‘मला ईश्वरी साक्षात्कार होत आहे’, अशी ज्याची समजूत झाली होती अशा हुंग चुआन या उच्चशिक्षित तरुणाने या बंडाचे नेतृत्व केले. अल्पावकाशात त्याने ३० सहस्र तरुणांची संघटना बांधली. ख्रिस्ती धर्म ‘मुख्य धर्म’ म्हणून घोषित केला. बुद्ध धर्मियांची मंदिरे पाडली. जे ख्रिस्ती झाले नाहीत, त्यांचा अतोनात छळ केला. चिन्यांची कुटुंबव्यवस्था मोडली. भूमी, अन्न आणि कापड यांवरील खासगी मालकी नष्ट केली. ख्रिस्ती साम्राज्य उभे करण्याचा हेतू होता; परंतु धर्मप्रसारापेक्षा त्या वेळी व्यापाराचे हित ब्रिटनला मोठे वाटले. दुबळे मांचू सरकार टिकवून धरून अधिकाधिक व्यापारी हित साधणे ब्रिटनला श्रेयस्कर वाटल्याने तायपिंग उठावाला पाठिंबा मिळाला नाही. तरीही १४ वर्षे दक्षिण आणि मध्य चीनमध्ये हुंग चुआन राज्य करत होता, हे विसरता येत नाही. तायपिंग उठाव फसला; पण त्यातून ‘चिनी राष्ट्रवादा’चा उगम झाला. मांचू सरकार तायपिंग सेनेचा बीमोड करण्यात तोकडे पडू लागल्यावर चीनच्या अनेक भागांत प्रादेशिक सेना उभ्या राहिल्या. याच काळात झेंग कुओ आणि ली हँग चँग हे दोन वीर पुरुष पुढे आले. चिन्यांच्या सैनिकीकरणावर त्यांनी भर दिला. ‘सैन्यात जाणे कमीपणाचे नसून देशरक्षणार्थ अत्यंत आवश्यक आणि सर्वाधिक प्रतिष्ठितपणाचे आहे’, असा विश्वास त्यांनी निर्माण केला. त्याचप्रमाणे पाश्चात्त्य भौतिक विद्यांचा प्रसार चीनमध्ये करण्यास त्यांनी प्रारंभ केला. ‘आपण जेवढे आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होऊ, तेवढा ख्रिस्ती धर्माचा प्रभाव अल्प होईल आणि ‘कन्फ्युशियन’ धर्म टिकून राहील’, असा विचार त्यांनी मांडला नि तो लोकांना पटला. पाश्चात्त्य विद्येच्या शाळा निघाल्या. लोक सैन्यात भरती होण्यासाठी झुंबड करू लागले.

७. आपापसांतील भांडणामुळे मराठ्यांचे राज्य बुडाले !

चीनने सैनिकीकरण चालू केले असतांना भारतात मात्र १९ व्या शतकाच्या प्रारंभी मराठ्यांकडून इंग्रजांनी भारताची सूत्रे स्वतःकडे घेतली. मराठ्यांनी मोगलांचा पराभव केला होता. देहलीवर नामधारी बादशहाच्या नावाने मराठेच राज्य करत होते. तथापि पेशवाई दुबळी झाली. वरचढ ठरलेल्या मराठे सुभेदारात एकवाक्यता राहिली नाही. आपापसांतील भांडणात मराठ्यांनी इंग्रजांना हस्तक्षेप करू दिला. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इंग्रजांचे शस्त्र आणि युद्धतंत्र आपल्याला भारी पडले, हे मराठ्यांनी ओळखले नाही. परिणामी राज्य गेले.

८. बलाढ्य चीन आणि इस्लामी प्रवृत्ती यांच्यासमोर हतबल झालेला भारत !

सार्वत्रिक असंतोषातून चीनमध्ये वर्ष १९११ मध्ये क्रांती झाली. चिनी, मांचू, मंगोल, तिबेटी आणि अन्य प्रांताचे मिळून एक राष्ट्र बनवण्याचे ठरले. चीनवर २५० वर्षे राज्य करूनही मांचूंना चिनी राष्ट्रवाद स्वीकारावा लागला. मांचू-चिनी ऐक्यासाठी चिन्यांना त्यांचे चिनीत्व सोडावे लागले नाही. मांचू इस्लामइतके दुष्ट नव्हते, तरी ‘मांचू राजवटीमुळे चिनी जनतेच्या जीवनात कसलीही सुधारणा होणार नाही’, असे चिनी जनतेला वाटले. मग ‘इतक्या शतकांच्या अनुभवानंतरही सुखासुखी इस्लामी प्रवृत्ती नव्या राष्ट्रवादाचा स्वीकार करील’, असे हिंदूंना का वाटले ? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनमध्ये व्यापार्‍यांचा नवा समाजगट उदयास आला. पाश्चात्त्य शिक्षणाने प्रभावित झालेल्या या वर्गास मांचू राजवटीविषयी तिरस्कार वाटत असे. भारतात पाश्चात्त्य शिक्षणाने प्रभावित झालेल्या हिंदुत्वाविषयी न्यूनगंड आणि इस्लामविषयी भयगंड वाटू लागला. चीनमध्ये ठरवून सुशिक्षित तरुण सैन्यात भरती झाले. राजकीय जागृतीसाठी राजकारणात शिरले. ‘युरोपलाच नव्हे, तर जपानला पुरून उरेल इतका महाबलाढ्यपणा चीनला आणायचा’, अशा शपथा घेतल्या गेल्या. ‘आपल्याकडे बलसागर भारत होवो’, अशी गाणी लिहिली गेली; परंतु पाकिस्तानवर उत्तर शोधण्यात आले नाही. ’

(संदर्भ : मासिक ‘धर्मभास्कर’, मार्च २००२)