बसगाडीतून प्रवास करतांना जीवनातील परिस्थिती स्वीकारण्याच्या संदर्भात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

‘जानेवारी मासात मी स्वरक्षण प्रशिक्षणासाठी सातारा येथे गेले होते. तेथे जातांना मी परिवहन मंडळाच्या साध्या लाल रंगाच्या गाडीत (एस्.टी.त) बसले होते. थोडे अंतर गेल्यावर मार्गात खड्डे असल्याने मला धक्के बसू लागले. मला त्याचा पुष्कळ त्रास होऊ लागला. त्या वेळी वाटले, ‘उगाच या गाडीत बसले. त्याऐवजी निमआराम (एशियाड) गाडीत बसले असते, तर बरे झाले असते.’ असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा ‘मला ही परिस्थिती स्वीकारायला जमत नाही’, असा विचार करून मी शांत बसले. त्यानंतर माझी पुढीलप्रमाणे विचारप्रक्रिया झाली.

सौ. कविता बेलसरे

१. अल्प मूल्याचे तिकीट असलेली गाडी आणि अल्प पुण्यसंचय असलेले जीवन सारखेच दुःखदायक

१ अ. अल्प मूल्य असलेल्या तिकिटाच्या गाडीत बसल्यावर अधिक मूल्याच्या तिकिटाच्या गाडीपेक्षा तुलनेने अधिक धक्के बसणे, त्याप्रमाणेच पुण्यसंचय अल्प असल्यास दुःखाचे धक्के अधिक बसणे आणि पुण्यसंचय अधिक असल्यास त्यांची तीव्रता अल्प असणे : ‘मी अल्प मूल्याचे (कमी किमतीचे) तिकीट असलेल्या गाडीत बसले आहे. त्यामुळे मला धक्के बसणारच आहेत. निमआराम गाडीत बसलेल्यांनी अधिक पैसे मोजले आहेत. त्यामुळे ते चांगला आणि सुखकर प्रवास करू शकतात.

पुण्यसंचय अल्प असेल, तर प्रारब्धाचे धक्के म्हणजे दुःख भोगावे लागणारच आहे. जे अधिक किंमत मोजून आले आहेत; म्हणजेच पुण्यसंचय घेऊन आलेले आहेत. त्यांना धक्के अल्प बसून त्यांचा प्रवास सुखकर असणारच आहे. त्यामुळे मी त्यांचा हेवा, द्वेष, मत्सर, तुलना इत्यादी करून उपयोग नाही. आपल्याला धक्के अल्प बसावयाचे असतील, तर त्यासाठी आपल्याला अधिक किमतीचे तिकीट काढावे लागणार, म्हणजेच चांगले कर्म करावे लागणार आहे. तरच आपला प्रवास चांगला होईल.

२. तिकीट संपेपर्यंत आणि प्रारब्ध भोगून संपेपर्यंत दोन्ही प्रवास करावेच लागणे

२ अ. एकदा गाडीत बसल्यावर त्याच गाडीतून शेवटपर्यंत प्रवास करावा लागत असणे, तसेच प्रारब्ध भोगल्यावाचून जिवाची सुटका नसणे : एकदा तिकीट काढून गाडीत बसल्यावर त्याच गाडीतून प्रवास करावा लागतो. मधेच तिकीट परत देता येत नाही. त्याप्रमाणेच या जन्मी आपण प्रारब्ध घेऊन आलो आहोत. ते पूर्ण भोगून संपल्यावरच आपली या जन्मातून सुटका होणार आहे.

३. परिस्थिती स्वीकारल्याने प्रवास सुकर होणे

३ अ. वर्तमान परिस्थिती आणि प्रारब्ध स्वीकारल्याने त्यांची तीव्रता अल्प होणे : मी ती परिस्थिती स्वीकारली. नंतर आपोआप चांगला महामार्ग लागल्याने धक्के बसणे अल्प झाले. आपण आपले प्रारब्ध एकदा स्वीकारले की, मग त्या प्रारब्धाची झळ आपल्याला बसत नाही. त्याचे काही वाटत नाही. ते सुखकर होते.

४. सहप्रवाशांशी जुळवून घेणे

४ अ. ‘प्रवास थोडाच वेळ आहे’, हे जाणून आपण न पटणार्‍या सहप्रवाशांशी जसे तात्पुरते जुळवून घेतो, तसेच ‘जीवनाचा प्रवास थोडा आहे’, हे जाणून समवेतच्या सर्व व्यक्तींशी वागल्यास त्यातून आनंद मिळणे : आपल्या समवेत गाडीत असलेल्या सहप्रवाशांशी कधी कधी आपले पटत नाही. किरकोळ वाद होतात. आपण आपल्या मनाची समजूत काढतो, ‘तीन घंट्यांचा तर प्रवास आहे. तेवढा वेळ आपण तडजोड करून बसूया.’

जीवनप्रवासात मात्र आपल्या समवेत प्रारब्धाने आलेल्या व्यक्तींच्या संदर्भात आपण असा विचार करत नाही. त्यांचे वागणे कायमचे मनात धरून बसतो. त्याच विचारात रहातो. त्या वेळी ‘हा प्रवासही थोडाच आहे. हा कधीतरी संपणार आहे. त्यामुळे तेवढा वेळ आपण थोडे समजून चांगल्या प्रकारे त्यांच्याशी वागूया’, असा विचार केल्यास जीवनाचा प्रवास आनंदात होईल.

५. सतर्क राहून स्वतःला पालटणे आवश्यक !

५ अ. स्वतःला पालटल्यास जीवनाचा प्रवास सुखकर होणे : आपण धक्के बसू लागले की, तात्पुरते सावध होतो; परंतु परत आपल्या सवयीप्रमाणेच वागतो. धक्के बसल्यावर लगेच सावध होऊन आपण स्वतःला सुधारले, तर परत तशी वेळ येणार नाही. हे जाणून आपण आपल्या आचरणात सुधारणा केली, तरच ‘पुढच्या वेळी चांगल्या गाडीतून आरामात जीवनाचा प्रवास करता येईल’, हे माझ्या लक्षात आले.’ – सौ. कविता बेलसरे, पुणे (२.४.२०१८)