(म्हणे) ‘आक्रमक हिंदुत्व हे इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यांसारखे !’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांचा त्यांच्या पुस्तकात हिंदुद्वेषी आरोप  

  • हिंदुत्व आक्रमक असते आणि ते इस्लामिक स्टेट आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांसारखे असते, तर या देशात एक तरी मुसलमान शिल्लक राहिला असता का ? सलमान खुर्शिद अशा प्रकारचे पुस्तक लिहू शकले असते का ? – संपादक
  • जे वास्तव नाही, त्याचा अशा प्रकारे आभास निर्माण करून हिंदूंना झोडपण्याचे काम काँग्रेस गेली ७४ वर्षे या देशात करत आली आहे. आता तिला राजकीयदृष्ट्या संपवणेच योग्य ! – संपादक
  • हिंदुत्वाला जाणूनबुजून ‘आक्रमक’ ठरवणारे खुर्शिद काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना विस्थापित करणार्‍या हिंस्र जिहादी आतंकवाद्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • फुटकळ काँग्रेसी १०० कोटी हिंदूंचा अवमान करतात आणि त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! अशांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत हिंदूंनी प्रयत्नरत रहायला हवे ! – संपादक
काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद

नवी देहली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या नव्या पुस्तकामध्ये त्यांनी हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेट आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली. ‘आक्रमक हिंदुत्व हे इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यांसारखे आहे’, असा आरोप त्यांनी या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक १० नोव्हेंबर या दिवशी प्रकाशित करण्यात आले.

काय आहे या पुस्तकात ?

‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकातील ‘द सॅफ्रॉन स्काय’ या भागामध्ये सलमान खुर्शिद यांनी म्हटले आहे, ‘गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरूपामुळे ऋषिमुनी आणि संत यांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म अन् हिंदुत्व बाजूला सारले गेले आहे. (ऋषिमुनी आणि संत यांना हिंदुत्वापासून वेगळे दाखवून हिंदूंची दिशाभूल करणारे धूर्त काँग्रेसी ! – संपादक) हे आक्रमक हिंदुत्व इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यांसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरूपासारखेच आहे.’ पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ११३ वर हा उल्लेख करण्यात आलेला आहे.

खुर्शिद यांच्याविरोधात तक्रार प्रविष्ट !

या प्रकरणी देहलीतील अधिवक्ता विवेक गर्ग यांनी सलमान खुर्शिद यांच्याविरोधात देहलीमध्ये तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करून खुर्शिद यांनी हिंदुत्वाची प्रतिमा मलीन केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा’, अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे.

(म्हणे) ‘कुणी हिंदु धर्माचा अवमान केला, तर मीही विरोध करीन !’ – सलमान खुर्शिद

हिंदु धर्माचा अवमान आतापर्यंत काँग्रेसनेच सर्वाधिक केला आहे. मग खुर्शिद यांनी कधी काँग्रेसला विरोध केला आहे का ? ‘रामसेतू अस्तित्वात नाही’, ‘भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम काल्पनिक आहेत’, असे म्हणणार्‍या काँग्रेसने काय हिंदु धर्माचा गौरव केला होता का ? त्या वेळी खुर्शिद गप्प का होते ?

पुस्तकावर होत असलेल्या टीकेनंतर खुर्शिद यांनी म्हटले आहे की, हिंदु धर्म हा अत्यंत उच्च दर्जाचा धर्म आहे. कुणी हिंदु धर्माचा अपमान केला, तर मीही त्याविरोधात बोलीन. मी म्हणालो की, जे हिंदुत्वाचे राजकारण करतात, ते चुकीचे आहेत आणि इस्लामिक स्टेटही चुकीचे आहे. अयोध्या वादावरून समाजात फूट पाडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तोडगा काढला. हा असा निर्णय आहे की, ‘आम्ही हरलो, तुम्ही जिंकला’ असे वाटत नाही. सध्या अयोध्येचा उत्सव हा एकपक्षीय उत्सव असल्याचे दिसून येत आहे.

‘भगवा आतंकवाद’ म्हणणार्‍या पक्षाच्या सदस्याकडून आणखी काय अपेक्षा करणार ? – भाजप

यासंदर्भात भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ट्वीट करून खुर्शिद यांच्यावर टीका केली. ‘मुसलमानांच्या मतांसाठी ‘भगवा आतंकवादा’सारख्या कल्पना मांडणार्‍या पक्षाच्या सदस्याकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते ?’, असा प्रश्‍न मालवीय यांनी उपस्थित केला.