पळसखेड पिंपळे (जिल्हा जालना) येथे शिवचरित्र पारायण सोहळा आणि धर्मसभा !
हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवचरित्रातून जनजागृती
भोकरदन (जिल्हा जालना) – भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे गावात शिवचरित्र पारायण सोहळा आणि धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवचरित्रातून जनजागृती करण्यात आली. या कार्यास गुरुवर्य खडेश्वर बाबा यांनी आशीर्वाद देऊन मार्गदर्शन केले. शिवचरित्र घराघरात वाचले जावे, यासाठी उद्योजक शरद भैय्या पिंपळे यांनी उपस्थितांना विनामूल्य शिवचरित्र ग्रंथांचे वाटप केले. या कार्यक्रमात विश्व हिंदु परिषद, हिंदु राष्ट्र सेना, बजरंग दल आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्यासह परिसरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
राष्ट्रीय वारकरी परिषदेचे मुख्य प्रशासक ह.भ.प. गुरुवर्य अरुण महाराज पिंपळे यांनी ‘हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यासाठी कालीपुत्र कालीचरणजी महाराज आणि हिंदुतेजसूर्य धनंजय देसाई यांच्या अधिकाधिक धर्मजागृती प्रचार सभा आयोजित करणार’, असे सांगितले. मराठवाड्यात प्रत्येक गावात शिवचरित्र पारायण होण्यासाठी साहाय्य करण्याचे आणि प्रचार करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. कमलेश कटारिया यांनी ‘धर्मावर श्रद्धा ठेवून शिवभक्ती करा’, असे आवाहन केले, तसेच इतिहास अभ्यासक सचिन पाटील यांनी ऐतिहासिक गोष्टींविषयी मार्गदर्शन केले. या वेळी सरपंच गणेश बापू पिंपळे यांनी अन्नदान केले. शिवराजे मित्र मंडळ आणि पळसखेडचे ग्रामस्थ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.