यवतमाळ येथील ‘संत उद्धव बाबा गोरक्षण’ अंतर्गत गोपालक आणि उपनगराध्यक्ष पवन जैस्वाल यांच्याकडून गोसेवेचे कौतुकास्पद कार्य !
यवतमाळ – यांत्रिकीकरणाच्या युगात गायी आणि गुरे यांचे पालन करणे अनेकांना कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकदा जनावरे मोकाट सोडली जातात. अशा वृद्ध आणि अपंग गायींचे संगोपन करण्याचे कार्य नेर (जिल्हा यवतमाळ) येथील उपनगराध्यक्ष आणि गोपालक श्री. पवन जैस्वाल हे गेल्या २५ वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. त्यांना गायींचा पुष्कळ लळा आहे. त्यांच्या एका हाकेवर अनेक गायी त्यांच्या मागे धावून येतात.
‘गायीची सेवा करणे हे परमेश्वरी कार्य’, असे मानणारे श्री. जैस्वाल !
‘संत उद्धव बाबा गोरक्षण’ अंतर्गत श्री. जैस्वाल गोरक्षणाचे कार्य निरंतर करत आहेत. कधी कत्तलीसाठी जाणार्या गायी पोलीस अनेकदा त्यांच्याकडे आणून सोडतात. ज्या शेतकर्यांना जनावरे पाळणे शक्य होत नाही, तेही त्यांच्या गायी श्री. जैस्वाल यांच्याकडे आणून देतात. प्रारंभी १५ गायींपासून चालू झालेले गोरक्षणाचे कार्य आज ४०० गायींपर्यंत पोचले आहे. या ४०० गायींचा सांभाळ करण्यासाठी त्यांना १० जण साहाय्य करतात. ‘गायीची सेवा करणे हे परमेश्वरी कार्य आहे’, असे ते म्हणतात. त्यामुळेच आज म्हातार्या झालेल्या किंवा आजारी असणार्या गायींचे माहेरघर म्हणजे ‘संत उद्धव बाबा गोरक्षण धाम’ झाले आहे.
गायींसह म्हशी, बकर्या आणि मेंढ्या यांचेही संगोपन !
‘संत उद्धव बाबा गोरक्षण धाम’ येथे आजारी गायींची विशेष काळजी घेतली जाते. त्या सुदृढ झाल्यावर कळपात एकरूप होतात. प्रतिदिन गायींना ढेप चारा दिला जातो. गायींच्या चार्यासाठी ५ एकरमध्ये चारा पिकांची लागवड करण्यात आली आहे. येथे १० एकरचे शेत गायींसाठी राखीव ठेवले आहे. अनेकांनी येथे गायींसह म्हशी, बकर्या आणि मेंढ्याही आणून सोडल्या आहेत. ४०० गायींच्या अंगावर ‘गोचीड’ येऊ नये, यासाठी ७० कोंबड्यांच्या साहाय्याने गोचीडवर नियंत्रण ठेवले जाते. येथे १२ सहस्र चौरस फुटांच्या गोठ्यात गायींची देखभाल केली जाते. उन्हाळ्यात गायींना हिरवा चारा मिळण्याचीही व्यवस्था केली जाते.
गोरक्षणासाठी प्रतिमासाला ४५ सहस्र रुपयांचा व्यय !
श्री. पवन जैस्वाल यांची गायींशी नाळ जुळली आहे. येथील गोरक्षणासाठी श्री. जैस्वाल यांना प्रतिमासाला ४५ सहस्र रुपयांचा व्यय होतो. गायींचे शेण ते शेतात टाकतात. त्यामुळे येथे चार्याची कधीच टंचाई जाणवत नाही.
(संदर्भ : ‘एबीपी माझा’)