‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’तर्गत जांभिवली (खालापूर) येथे महिलांसाठी ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान !

व्याख्यानाला उपस्थित युवती आणि महिला

खालापूर (जिल्हा रायगड) – महिलांनी धर्मशिक्षण घेतले, तर ती दोन कुटुंबांना धर्मशिक्षित करू शकते. उद्याचे भविष्य हे महिलांच्या हाती असून येणार्‍या पिढीला त्या धर्मज्ञान देऊ शकतात. म्हणून आज धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका सौ. शिल्पा किचंबरे यांनी केले. जांभिवली, खालापूर येथे महिलांसाठी ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. महिलांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र आणि महत्त्व, नमस्कार का करावा ?, नमस्कार करण्याची योग्य पद्धत कोणती ? याविषयीचे विवेचन त्यांनी या वेळी केले. परिसरातील महिलांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. व्याख्यानाच्या आयोजनात श्री. शशिकांत पाटील आणि श्री. शशिकांत दळवी यांनी पुढाकार घेतला होता.

वैशिष्ट्यपूर्ण

१. जांभिवलीच्या ग्रामपंचायतीचे सदस्य, तसेच ‘स्वराज्य सामाजिक विकास संस्थे’चे अध्यक्ष श्री. प्रमोद शिर्के यांनी उपस्थित महिलांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’तर्गत ५० ग्रंथांचे संच भेट स्वरूपात दिले. ‘ज्ञानशक्ती प्रथम महिलांमध्ये निर्माण व्हावी’, या उद्देशाने असे नियोजन केल्याचे श्री. शिर्के यांनी सांगितले.

२. ‘आम्हाला ठाऊक नसलेल्या धर्मातील अनेक गोष्टी व्याख्यानातून समजल्या, असे धर्मशिक्षण नियमित मिळाले, तर दैनंदिन जीवनात त्याचे आचरण करणे सोपे होईल. आमची धर्मावरील श्रद्धा दृढ होईल’, असे उपस्थित महिलांनी सांगितले.