ज्या क्षणी आपल्या जीवनात गुरूंचा प्रवेश होतो, त्या क्षणापासून प्रतिदिन आनंदाची दिवाळीच असते ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पू. रमानंद गौडा

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष सत्संगाचे आयोजन !

मंगळुरू (कर्नाटक) – सर्वत्र दिवे लावून दिवाळीचा सण साजरा केला जातो. साधकाला जीवनात गुरुकृपेने सदैव आनंद मिळत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी प्रत्येक क्षण दिवाळीच असते. ज्या क्षणी आपल्या जीवनात गुरूंचा प्रवेश होतो, त्या क्षणापासून प्रतिदिन आनंदाची दिवाळीच असते. त्यामुळे आपण दिवाळीच्या निमित्ताने अंतर्मनापासून गुरूंविषयी कृतज्ञतारूपी दीप प्रज्वलीत करूया. प्रत्येक कृतीत भगवंताशी अनुसंधान ठेवून आनंद प्राप्त करूया. आपल्या हृदयातील अज्ञानरूपी अंधःकार नष्ट करून ज्ञानरूपी प्रकाश भरून घेऊया. आपल्या मनमंदिरात ज्ञानदीप प्रज्वलीत करून खरी दिवाळी साजरी करूया. तेव्हाच आपल्या हृदयरूपी अयोध्येत प्रभु श्रीरामाचे आगमन होईल आणि तेव्हाच खरी दिवाळी साजरी होईल, असे भावपूर्ण मार्गदर्शन सनातनचे कर्नाटकमधील धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर या दिवशी ‘ऑनलाईन’ विशेष सत्संगाचे आयोजन केले होते. या सत्संगात ते मार्गदर्शन करत होते. या सत्संगाचा लाभ साधक आणि धर्मप्रेमी असा मिळून १ सहस्र १९३ जणांनी घेतला. कार्यक्रमाचा उद्देश श्री. काशीनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांनी सांगितला.

पू. गौडा मार्गदर्शनात पुढे म्हणाले, ‘‘दिवाळीनिमित्त आपण प्रत्येक जण घराची स्वच्छता करतो. घराच्या स्वच्छतेसह मनाचीही स्वच्छता करूया. मनाची स्वच्छता, म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आपल्या आत्म्याला सतत ईश्वरी तत्त्वाशी जोडण्याची प्रक्रिया होय ! अशा रितीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, ही अंतर्मनाची साधना आहे. यासमवेतच आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन करून समष्टी सेवाही करायची आहे. पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आपण भक्ती वाढवली पाहिजे. भक्तीच्या माध्यमातून आपण ईश्वरी कृपेला पात्र होऊ शकतो आणि आत्मोद्धार करून घेऊ शकतो. गेल्या २ मासांपासून चालू असलेल्या सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’मध्ये साधकांनी परिश्रमपूर्वक, पुढाकार घेऊन आणि गुरुकार्याचे दायित्व घेऊन प्रयत्न केले. या अभियानाचे यश गुरुकृपेने आणि तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांनीच प्राप्त झाले आहे.’’

क्षणचित्र

या वेळी साधकांनी सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत केलेले प्रयत्न कथन केले. साधकांनी केलेल्या प्रयत्नांविषयी पू. रमानंद गौडा यांनी त्यांचे कौतुक केले आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे सर्व साधकांची पुष्कळ भावजागृती झाली आणि अधिक प्रयत्न करण्यासाठी आशीर्वाद मिळाले.

साधकांना जाणवलेली सूत्रे

१. सौ. सुनीता, कुशालनगर : या मार्गदर्शनातून समष्टीसह व्यष्टी साधनाही किती श्रेष्ठ आहे, हे समजले. ग्रंथ अभियानाचे अनुभव ऐकतांना भावजागृती झाली. ‘गुणवृद्धीसाठी सतत प्रयत्न करायला हवेत’, हे लक्षात आले.

२. सौ. शोभा, सिद्दापूर : पू. अण्णांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर ‘माझा देह प्रत्येक क्षणी गुरुसेवेत आणि गुरुचरणी तल्लीन व्हावा’, असे वाटले.

३. सौ. तारा, धारवाड : साधकांचे अनुभव आणि संतांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर ‘मी आणखी प्रयत्न वाढवायला हवेत’, असे वाटले.

४. सौ. मालिनी, पडुबिद्रे : सर्व साधकांचे प्रयत्न ऐकतांना भावजागृती होत होती. माझ्यातील कर्तेपणासह इतर अनेक दोषांची जाणीव होत होती. ‘गुरूंनी माझ्यात सुधारणा व्हावी, यासाठी अभियानाची सेवा दिली आहे’, असे वाटले.

५. सौ. निमिता कामत, कासरगोडु : पू. अण्णांचा प्रत्येक शब्द ऐकतांना कृतज्ञता वाटत होती. ‘त्यांचे प्रत्येक वाक्य माझ्या अंतर्मनात जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करावेत’, असे वाटत होते.

६. सौ. रेवती हरगी, सागर : पू. अण्णा साधकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतांना  ‘आम्ही ‘आमच्यामुळेच होत आहे’, असा अहंभाव ठेवतो, त्यामुळे साधनेत हानी करून घेतो’, असे वाटले.

७. सौ. बनशंकरी संपेमने, शिवमोग्गा : भावसत्संगात त्रासदायक आवरण न्यून होत असल्याचे जाणवत होते. पू. रमानंद अण्णा कृतज्ञता व्यक्त करत असतांना ‘सर्व तुम्हीच करत आहात आणि साधकांना श्रेय देत आहात’, अशी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती.