परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर जीवनातील अत्यंत कठीण परिस्थितीतही स्थिर राहून साधना करणार्या नवीन पनवेल येथील सौ. मनीषा बाईत !
काही मासांपूर्वी नवीन पनवेल येथील सौ. मनीषा बाईत यांच्याकडे काही साधक प्रसारानिमित्त गेले होते. त्यांनी सौ. मनीषा यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ दाखवल्यावर त्या दैनिकाच्या वर्गणीदार झाल्या. त्यांना धर्मशिक्षण वर्गाविषयी सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या घरी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची अनुमती दिली. त्यानंतर त्यांना कठोर प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्यांनी त्या प्रसंगांना धिराने तोंड दिले. तेव्हा गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर त्या शांत आणि स्थिर राहू शकल्या. या लेखातून ‘प्रतिकूल प्रसंगाला धिराने कसे तोंड द्यायचे ?’, हे वाचकांना शिकता येईल.
‘सौ. मनीषा बाईत यांचा हा लेख वाचल्यावर ‘त्यांच्यासारखे कुणी असू शकते’, यावर विश्वास बसत नाही. मन आश्चर्यचकित होते. साधनेत येणार्या कौटुंबिक अडचणींच्या संदर्भात बर्याच साधकांच्या मनात काळजी असते. ‘सौ. मनीषा बाईत यांनी त्यांच्या फार मोठ्या कौटुंबिक अडचणींना कसे तोंड दिले ?’, हे हा लेख वाचल्यावर साधकांच्या लक्षात येईल. सौ. मनीषा बाईत यांची साधनेत प्रगती होत असल्यामुळे त्या अडचणींना सहजपणे तोंड देऊ शकल्या. ‘त्यांचा साधनेतील पुढचा प्रवास असाच जलद गतीने होईल’, याची मला निश्चिती आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.६.२०२०) |
१. सौ. मनीषा बाईत यांच्या घरी धर्मशिक्षणवर्ग चालू होणे
‘सनातन संस्थेचे साधक माझ्या घरी आले होते. त्यांनी मला ‘तुमच्या घरी धर्मशिक्षणवर्ग चालू करू शकतो का ?’, असे विचारले. मी त्याविषयी माझ्या यजमानांना विचारल्यावर त्यांनी अनुमती दिली. २ मासांपासून आमच्या घरी प्रत्येक शनिवारी धर्मसत्संग होत आहे. त्या सत्संगाचा आम्हाला पुष्कळ लाभ झाला. मी कामावरून घरी परत आल्यानंतर सत्संगातून मिळणार्या चैतन्याच्या ओढीने सत्संगाची सर्व सिद्धता करू शकत होते.
२. यजमानांनी त्रास देणे आणि त्यांनी घटस्फोट हवा असल्याचे सांगणे
२ अ. यजमानांनी घरखर्चासाठी थोडेच पैसे देणे आणि ते न पुरल्याने बाहेरची घरकामे करावी लागणे : यजमानांना भरपूर वेतन असतांनाही ते ‘माझ्या सुट्या फार झाल्या’, असे मला सांगायचे आणि मला केवळ ३ – ४ सहस्र रुपये घरखर्चासाठी द्यायचे. माझी दोन्ही मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्याने मला यजमान घरात व्ययासाठी देत असलेले पैसे पुरत नव्हते. घरात भांडणे नको; म्हणून मी बाहेरची घरकामे करायला आरंभ केला.
२ आ. यजमानांनी रात्री उशिरा घरी येऊन काहीतरी कारण काढून साधिकेवर चिडणे आणि कधी तिला घराबाहेरही उभे करणे : यजमान रात्री उशिरा घरी यायचे आणि ‘जेवण चांगले बनवले नाही. जेवणात मीठ घातले नाही’, अशी कारणे काढून माझ्याशी वाद घालायचे. ते जेवणाचे भरलेले ताट हातांत घेऊन फेकून द्यायचे. ते कधी मला घराबाहेरही उभे करत. मुलांनी वडिलांना याविषयी विचारल्यावर ते मुलांना सांगायचे, ‘‘ती मला ‘हाताने जेवायला घ्या’, असे सांगते; म्हणून मी तिला बाहेर ठेवले आहे.’’ मी त्यांना कधीही उलट बोलले नाही. दुसर्या दिवशी सकाळी शेजारच्यांनी ‘तुमच्या घरातून कसला आवाज येत होता ?’, असे मला विचारल्यावर मी त्यांना ‘माझ्या हातातून ताट पडले’, असे सांगायचे.
२ इ. घरी धर्मशिक्षणवर्ग चालू झाल्यानंतर गुरुदेवांना ‘मला हे सर्व सहन करण्याची शक्ती द्या’, अशी प्रार्थना करणे : आमच्या घरी धर्मशिक्षणवर्ग चालू झाल्यानंतर अशा प्रसंगात मी गुरुदेवांना ‘मला हे सर्व सहन करण्याची शक्ती द्या’, अशी प्रार्थना करायचे. घरी प्रतिदिनच असे प्रसंग होत होते. धर्मशिक्षणवर्गातून मिळणार्या चैतन्यामुळे मी शनिवारी होणार्या धर्मशिक्षणवर्गाची वाट बघत असे.
२ ई. धर्मशिक्षणवर्ग चालू होऊन २ मास झाल्यावर अकस्मात् यजमानांनी ‘घटस्फोट हवा आहे’, असे सांगणे : घरी धर्मशिक्षणवर्ग चालू झाल्यानंतर २ मासांनी अकस्मात् माझी काळजी वाढली. ‘यजमान माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत’, असे मला वाटत होते. त्या वेळी गुरुदेवांना प्रार्थना करून मी त्यांना ही अडचण सांगितली. त्यानंतर यजमान लपवत असलेला प्रसंग माझ्या लक्षात आला. पुढे दोनच दिवसांनी त्यांनी ‘मला घटस्फोट हवा आहे’, असे मला सांगितले आणि ते घर सोडून निघून गेले. धर्मशिक्षणवर्गामुळे एवढ्या वर्षांपासून ते लपवत असलेले प्रसंग बाहेर आले.
३. कठीण प्रसंगात अनुभवलेली गुरुकृपा !
३ अ. ‘गुरुदेव धीर देत आहेत’, असे वाटत असल्याने या प्रसंगात शांत आणि स्थिर राहू शकणे : ‘मला स्थिर रहाता येऊ दे’, अशी माझ्याकडून श्री गुरुचरणी सतत प्रार्थना होत होती. या प्रसंगात श्री गुरूंच्या कृपेनेच मी खचले नाही. त्या वेळी मला सहजतेने रहाता येत होते. ‘गुरुदेव मला सतत धीर देत आहेत’, असे मला जाणवत होते. दुसर्या दिवशी घराच्या बाजूच्या सर्व बायका आमच्या घरी आल्या. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘त्यांना जायचे होते; म्हणून ते गेले. मला त्याचे काही वाटत नाही.’’ त्या वेळी ‘आतूनही मी शांतच होते’, असे मला जाणवत होते. मी या घटनेविषयी कुणालाही काहीच सांगितले नाही. गुरुदेवांनी या प्रसंगाच्या आधीच २ मास माझ्या घरात धर्मशिक्षणवर्ग चालू केला. त्यामुळे ‘माझे मन स्थिर राहू शकत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
३ आ. धर्मशिक्षणवर्ग चालू झाल्यावर गेल्या १५ वर्षांपासून होणारा त्रास दूर होणे : दोन मासांनंतर या सगळ्या परिस्थितीमधून देवाने मला बाहेर काढले. केवळ गुरुदेवांच्याच कृपेने १५ वर्षांपासून होणारा हा त्रास दूर झाला होता. ‘हा त्रास सहन करण्यापेक्षा देवाने मला या त्रासातून सोडवले’, असेच मला वाटले.
३ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक घेऊन न्यायालयात गेल्यावर सतत नामजप होणे : त्यानंतर न्यायालयात खटला चालू झाला. या खटल्यासाठी मला एकटीलाच बांद्रयाला न्यायालयात जावे लागायचे. तेव्हा मला फार भीती वाटायची. मी दैनिक ‘सनातन प्रभात’ जवळ घेऊन न्यायालयात जात असे. गुरुदेवांच्याच कृपेने त्या वेळी माझा नामजप सतत चालू असायचा.
३ ई. साधिकेच्या यजमानांनी पोटगी देण्यास नकार देणे आणि त्यांनी साधिका रहात असलेल्या खोलीचे भाडे मागणे : यजमान मला पोटगी द्यायला सिद्ध नव्हते. उलट ते मी रहात असलेल्या खोलीचे भाडे मागत होते. ‘बाहेरची घरकामे करून दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा व्यय करणे आणि रहात असलेल्या खोलीचे भाडे देणे’ मला जमणार नाही’, अशी माझी अडचण मी अधिवक्त्यांना सांगितली. त्यांनाही ते पटले; परंतु आता यजमान मला पोटगी द्यायला सिद्ध नाहीत. ते काहीनाकाही कारणे सांगून मला पोटगी देण्यास टाळत आहेत. ते या खटल्यात विशेष लक्ष घालत नसल्याने हा खटला प्रलंबित आहे.
३ उ. ‘यजमान घर सोडून गेल्याने घरातील व्यय कसा करायचा ?’, असे वाटत असतांनाच देवाच्या कृपेने घरबसल्या कामे मिळणे : असे असले, तरी या सगळ्या प्रसंगांमध्ये मी आणि माझी मुले स्थिर होतो. ‘आम्हाला ईश्वर आणि श्री गुरु यांच्याविना कुणीही नाही’, अशी आमची श्रद्धा दृढ झाली. आमच्या घरी नियमितपणे प्रत्येक शनिवारी धर्मशिक्षणवर्ग होत होता आणि या वर्गाची आम्ही कुटुंबीय आतुरतेने वाट बघायचो. यजमान घर सोडून निघून गेल्यानंतर ‘आता कसे करायचे ?’, असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला. त्या वेळी गुरुकृपेनेच मला घरबसल्या जेवणाचे ८ डबे आणि ५ – ६ दिवसांतच ८ घरची घरकामे करण्याचे काम मिळाले.
३ ऊ. दुपारपर्यंत बाहेरील कामे करून संध्याकाळच्या वेळेत नियमितपणे सेवा करणे : ‘प्रतिदिन सकाळी ९.३० ते दुपारी ४ या कालावधीत ८ घरांमध्ये घरकामे करणे आणि रात्री जेवणाचे ८ डबे बनवणे’, असे माझे काम चालू झाले. सकाळी ८ घरांतील कामे संपवून दुपारी घरी आल्यानंतर मी जेवून सायंकाळी ५.३० ते ७ या कालावधीत नियमितपणे सेवेला जाऊ लागले. बर्याचदा दुपारची जेवणाची भांडी घासायची राहिलेली असायची; पण ‘सेवेचा वेळ भांडी घासण्यासाठी वापरला, तर सेवेला जाता येणार नाही’, असा विचार करून ‘मी नियोजित वेळेत सेवाच करीन आणि घरी आल्यानंतर घरातील कामे करीन’, असे मी ठरवले.
३ ए. सेवा करून घरी आल्यावर रात्री १० वाजेपर्यंत जेवणाचे ८ डबे बनवून होणे : देवाच्या कृपेने जेवणाचे डबे रात्री १० वाजता द्यावे लागत. ‘सेवा करून घरी परत आल्यानंतर रात्री ८ वाजता मी स्वयंपाकाला आरंभ केला, तरीही रात्री १० वाजेपर्यंत माझे जेवणाचे ८ डबे बनवून होत होते’, असे मला बर्याच वेळा अनुभवता आले. शेजारच्या महिला माझ्याशी बोलायला येऊन बसायच्या आणि मला पोळ्या लाटायला किंवा भाजी निवडायला साहाय्य करायच्या. त्यामुळे मला कधीही कामांचा ताण आला नाही.
३ ऐ. श्री गुरूंच्या कृपेने गुरुपौर्णिमेच्या वेळी अनेक प्रकारच्या सेवा करता येणे : काही दिवसांनी मी ग्रंथप्रदर्शनाची सेवा दायित्व घेऊन करू लागले. तेव्हा धर्मशिक्षणवर्गातील साधकही सेवेला येऊ लागले. गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘गुरुपौर्णिमेच्या वेळी प्रसाराला जाणे, नियतकालिकाच्या वर्गणीदारांना अंक देणे, त्यांना सात्त्विक उत्पादने देणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, पंचांगांचे वितरण करणे’, अशा अनेक प्रकारच्या सेवा मला करता आल्या.
३ ओ. मुलांनी घरकामात साहाय्य करणे : मी सेवेला जाते; म्हणून मुलेही ‘घरातील केर काढणे, देवापुढे दिवा लावणे, भाजी निवडायला साहाय्य करणे’, अशा प्रकारे मला साहाय्य करू लागली.
४. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. आम्हाला रामनाथी (गोवा) येथील आश्रमात जाण्याची फार ओढ लागली होती. देवाच्या कृपेने त्याचेही नियोजन झाले. आम्ही रामनाथी आश्रमात गेल्यानंतर ‘आम्हाला पुष्कळ शांतता आणि चैतन्य मिळत आहे’, असे जाणवून माझा भाव दाटून येत होता.
आ. रामनाथी आश्रमात प्रत्येक ठिकाणी मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.
इ. आम्ही रामनाथी आश्रमात ४ दिवस राहिल्यानंतर माझा मुलगा कु. श्रवण मला म्हणाला, ‘‘आई, मला सुटीत आश्रमात सेवेला यायचे आहे.’’ त्याचे हे बोलणे ऐकून मला फार कृतज्ञता वाटली.
५. आलेली अनुभूती
उशीखाली दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवल्यावर भयानक स्वप्ने पडणे बंद होणे : आम्ही रामनाथी आश्रमातून घरी परत आल्यानंतर एकदा रात्री मला भयानक स्वप्न पडले. ‘कुणीतरी मला दाबत आहे आणि मी मोठ्याने ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असे ओरडत आहे’, असे मला दिसले. ‘अशी स्वप्ने पडू नयेत’, यासाठी दुसर्या दिवशी मी उशीखाली दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवले. त्या रात्री मला स्वप्न पडले नाही आणि त्यानंतरही मला तसा त्रास पुन्हा कधीही झाला नाही. ‘देवानेच सुचवल्यामुळे मी ही कृती करू शकले’, याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मनीषा बाईत, नवीन पनवेल (२८.३.२०२०)
कल्याण (जिल्हा ठाणे) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चारुलता नखाते यांना सौ. मनीषा बाईत यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. ‘सौ. मनीषा बाईत यांनी त्यांच्या यजमानांच्या समवेत १५ वर्षे संसार केला, तरीही यजमान त्यांना सोडून गेल्यावर त्या भावनाशील झालेल्या दिसल्या नाहीत.
२. मुलांवर साधनेचे संस्कार करणे
मनीषाताईंची दोन्ही मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. ताई मुलांना नियमितपणे सकाळी उठतांना ‘कराग्रे वसते लक्ष्मी..’ हा श्लोक म्हणायला सांगतात. त्याचप्रमाणे त्या मुलांकडून ‘प्रतिदिन सकाळी देवाला नमस्कार करणे, आईला नमस्कार करणे, संध्याकाळी वहीचे एक पान ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लिहिणे’, अशा प्रकारच्या कृती करवून घेऊन त्यांच्यावर साधनेचे संस्कार करतात. त्यांनी वडील घरी नाहीत; म्हणून मुलांचे अनावश्यक लाड केले नाहीत. त्यांनी मुलांना स्वावलंबी बनवले आणि त्यांना शिस्त लावली. त्या रात्री झोपण्यापूर्वी मुलांना दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांच्या आलेल्या अनुभूती मोठ्याने वाचून दाखवतात आणि त्यानंतर झोपतात.
३. शेजार्यांनी ‘तुमच्या घरात चांगले वाटते’, असे साधिकेला सांगणे आणि साधिकेने त्यांना धर्मशिक्षणवर्गाला येण्यास सांगणे
शेजारील व्यक्ती त्यांच्या घरी आल्यावर म्हणतात, ‘‘तुमच्या घरात चांगले वाटते. ‘दिवसभरात एकदा तरी तुमच्याकडे यावे’, असे आम्हाला वाटते.’’ त्या वेळी ‘आमच्या घरी धर्मशिक्षणवर्ग चालू असतो; म्हणून तुम्हाला असे वाटते. तुम्हीही या वर्गाला येत जा’, असे त्या घरी आलेल्या व्यक्तींना सांगतात.
४. घडलेल्या प्रसंगाकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहाणे
सर्वसाधारणपणे समाजात अशा घटना घडल्या, तर त्या घटना अन्य जणांना सांगण्यात स्त्रियांचा निरर्थक वेळ वाया जातो; परंतु मनीषाताईंनी शेजारचे लोक आणि नातेवाईक यांना सांगितले, ‘‘यजमानांना जे योग्य वाटले, ते त्यांनी केले. त्यांच्याशी माझा तेवढाच देवाण-घेवाण हिशोब होता. तो पूर्ण झाला. त्यामुळे आता मला त्यांच्याविषयी काही वाटत नाही. मला त्यांचा रागही येत नाही.’’
५. गुरूंप्रतीचा कृतज्ञताभाव
ताईंच्या यजमानांच्या अयोग्य वागण्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. ‘घरी धर्मशिक्षणवर्ग चालू झाल्यानंतर गुरुकृपेने अवघ्या २ मासांतच त्यांना यजमान देत असलेल्या त्रासातून मुक्तता झाली’, यासाठी त्यांना श्री गुरूंप्रती अतीव कृतज्ञता वाटते. त्यांनी मुलांना आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करून स्वतःची आणि मुलांची श्री गुरु अन् ईश्वर यांच्याप्रती श्रद्धा दृढ केली.
६. श्रद्धा
मी मनीषाताईंना कधीही गार्हाणे करतांना बघितले नाही. त्यांची श्री गुरूंवर फार श्रद्धा आहे. ‘श्री गुरूंच्या कृपेमुळेच मी या सगळ्या प्रसंगांतून बाहेर पडून शांत आणि स्थिर राहू शकते. श्री गुरुच हे सर्व करण्यासाठी मला बळ देत आहेत. तेच मला आतून सर्व सुचवत आहेत’, असे सांगतांना मनीषाताईंचा श्री गुरूंप्रती भाव दाटून येतो.
७. कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, ‘तुम्ही मला हा धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा दिली आणि अशा साधकांच्या सहवासात ठेवले’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. चारुलता भारत नखाते, कल्याण, जिल्हा ठाणे. (२८.३.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |