पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणांना स्पर्श !
श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव !
कोल्हापूर, १० नोव्हेंबर (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजता सूर्यकिरणे महाद्वार येथे होती. यानंतर ५ वाजून २५ मिनिटांनी गणपति मंदिर, ५ वाजून ३५ मिनिटांनी सूर्यकिरणे उंबर्याच्या आत आली आणि ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला.
या संदर्भात अधिक माहिती देतांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाइकवडे म्हणाले, ‘‘किरणोत्सव चांगला होण्यासाठी समितीच्या वतीने मार्गातील काही अडथळे हटवण्यात आले होते. उद्याही आणखी काही अडथळे काढण्यात येणार आहेत. भाविकांना हा किरणोत्सव चांगल्या प्रकारे पहाता येण्यासाठी मंदिराच्या दक्षिण द्वाराजवळ सध्या एक ‘डिजिटल स्क्रिन’ (चलचित्र पहाता येईल, असा मोठा पडदा) लावण्यात आली असून उद्यापासून मिरजकर तिकटी आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेही ‘डिजिटल स्क्रीन’ बसवण्यात येणार आहेत.’’