महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आगरा (उत्तरप्रदेश) येथील चि. आराध्या सहगल हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !
रामनाथी (गोवा) – सध्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात काही दिवसांसाठी आलेली आणि मूळची आगरा, उत्तरप्रदेश येथील चि. आराध्या सहगल (वय ५ वर्षे) ही दैवी बालसाधिका असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे, असे येथे झालेल्या एका सत्संगात घोषित करण्यात आले. ९ नोव्हेंबर या दिवशी ही आनंदवार्ता सर्वांना देण्यात आली. अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु (डॉ.) आठवले या सत्संगाला उपस्थित होते. पू. तनुजा ठाकूर यांचीही या वेळी उपस्थिती लाभली. चि. आराध्या हिचे वडील श्री. मनीष सहगल, आई सौ. भाविनी सहगल हे ही सत्संगात सहभागी झाले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चि. आराध्याला भेटवस्तू देऊन, तर पू. तनुजा ठाकूर यांनी तिला खाऊ देऊन तिचा सत्कार केला.
चि. आराध्याच्या जन्मानंतर तिच्या आई-वडिलांच्या साधनेची गती वाढली ! – पू. तनुजा ठाकूर
पू. तनुजा ठाकूर या प्रसंगी म्हणाल्या, ‘‘चि. आराध्याच्या जन्मानंतर तिच्या आई-वडिलांची साधना चांगल्या प्रकारे चालू झाली. तिचे वडील श्री. मनीष यांचा समष्टी सेवेतील सहभाग वाढला. तिची आई सौ. भाविनी यांना आध्यात्मिक त्रास होता. चि. आराध्याच्या जन्मानंतर दोघांच्या साधनेची गती वाढली. एकदा मी झारखंड येथे जात असतांना श्री. मनीष यांनी मला त्यांच्या घरी येण्याविषयी विचारले असता चि. आराध्याकडे जाण्याविषयी मला विशेष ओढ जाणवली.’’
असे उलगडले चि. आराध्याचे विविध दैवी गुण !
सत्संगाच्या आरंभी चि. आराध्याने श्रीगुरूंचा ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः ….’ हा श्लोक अन् विविध देवतांचे संस्कृत श्लोक सुस्पष्ट उच्चारांत म्हटले. यानंतर तिने ती करत असलेल्या साधनेविषयी थोडक्यात सांगितले. ‘चि. आराध्याचे बोलणे ऐकून, तसेच तिच्याकडे पाहून काय जाणवते ?’, असे विचारले असता, सत्संगात सहभागी असलेल्या साधकांनी चि. आराध्यामधील निरागसता, भाव, प्रीती आदी विविध गुणांविषयी सूत्रे सांगितली. यानंतर चि. आराध्या ही दैवी बालसाधक असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे, असे घोषित करण्यात आले.
ही आनंदवार्ता कळल्यानंतर चि. आराध्याचे वडील श्री. मनीष सहगल यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. तनुजा ठाकूर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली, तसेच चि. आराध्याच्या आई-वडिलांनी चि. आराध्याची गुणवैशिष्ट्ये सांगितली.
स्वत:च्या आध्यात्मिक प्रगतीची वार्ता समजल्यानंतरही स्थिर असणारी चि. आराध्या !१. स्वतःची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतरही चि. आराध्या स्थिर होती. तिच्या तोंडवळ्यावरील स्थिरता सर्वांना अनुभवता यावी, यासाठी तिला सर्वांकडे पहाण्यास सांगण्यात आले, तेव्हा तिने लगेच त्याप्रमाणे कृतीही केली. २. सत्संगातील साधक तिच्याविषयी बोलत असतांना ‘तुला ते बोलतात, ते कळले का ? ते काय बोलले ?’, असे विचारल्यावर ती साधकांनी तिच्याविषयी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये सांगत होती. ‘तुझ्यात अशी गुणवैशिष्ट्ये आहेत ना ?’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गमतीने विचारल्यावरही ती निरागसपणे ‘हो’, असे म्हणत होती. ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आता लवकर संत होणार ना ? तुझे दायित्व (इतरांकडून साधना करवून घेण्याचे) वाढले आहे’, असे म्हटल्यावर चि. आराध्या ‘हो’, असे म्हणाली. या वेळी तिच्यातील निरागसतेचे दर्शन घडले. |