प्रदूषित यमुनेवरील श्रद्धा !
संपादकीय
देशातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनकर्ते आणि प्रशासन कृतीशील कधी होणार ?
श्रद्धा ठेवण्यासाठी बुद्धी लागत नाही. जेव्हा बुद्धीचा लय होतो किंवा तिचे ऐकले जात नाही, तेव्हा श्रद्धा निर्माण होऊ शकते; मात्र श्रद्धा निर्माण होण्यासाठी तरी बुद्धीचा वापर करावा लागतो, हेही तितकेच खरे आहे. भारतातील गंगानदीला फार मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. गंगानदीचे पृथ्वीवरील अवतरण शंकराच्या जटेतून झाले आहे. गंगानदी पापनाशिनी आहे. तिचे पाणी कितीही गढूळ दिसले, तरी ते शुद्ध असते. त्यात विषाणू अधिक काळ टिकत नाहीत. विषाणू गंगानदीमध्ये सोडले, तरी त्याचा काही कालावधीत नाश होतो, हे अनेक प्रयोगांती सिद्ध झाले आहे. अनेक भारतीय आणि विदेशी शास्त्रज्ञांनी ते मान्य केले आहे. याच गंगानदीची एक उपनदी असणारी यमुना ही नदी आहे. यमुनेलाही आध्यात्मिक महत्त्व आहे. याच यमुनेच्या किनारी भगवान श्रीकृष्णाने अनेक लीला केल्या आहेत. सध्या ही नदी भारतातील अत्यंत प्रदूषित नदी म्हणून ओळखली जात आहे. याच प्रदूषित नदीमध्ये देहलीतील महिलांनी छठ पूजा केल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. यात प्रदूषित नदीमध्ये या महिलांनी अंघोळही केली. त्यांना याविषयी विचारण्यात आले असता ‘‘आम्ही पूजेसाठी आलो आहोत. ही आमची परंपरा आहे, त्याचे आम्ही पालन करत आहोत. अन्य आम्हाला काही ठाऊक नाही’’, असे त्यांनी सांगितले. हिंदु धर्मियांमध्ये एकीकडे धर्माचरण अल्प होत असतांना अजूनही पूजेसाठी काही महिला अशा प्रकारचा भाव ठेवून प्रदूषित नदीमध्ये पूजा करत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. ते नाकारताही येणार नाही. या महिलांचे त्यांच्या भावामुळे देव रक्षण करील, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवील; मात्र ज्यांच्यामुळे ही नदी आज प्रदूषित झाली आहे, जे हे प्रदूषण दूर करण्यासाठी काहीही करत नाहीत, त्यांच्यावर देवाची अवकृपा होऊन त्यांना मात्र पाप भोगावे लागणार, हेही तितकेच सत्य आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळातील संपूर्ण दळणवळण बंदीच्या काळात हीच यमुना नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषणमुक्त झाल्याचे दिसून आले होते. नदीचे पाणी निर्मळ दिसू लागले होते. त्यावर दिसणारा पांढरा फेस गायब झाला होता; मात्र दळणवळण बंदी उठल्यानंतर काही आठवड्यांतच यमुना नदी पुन्हा प्रदूषित झाली. देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने निवडणुकीमध्ये आश्वासन देतांना ‘यमुना नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी त्यांचे सरकार प्रयत्न करील’, असे म्हटले होते; मात्र हे आश्वासन हवेतच विरले आहे, हे स्पष्ट दिसत आहे. ज्या पद्धतीने गेली अनेक वर्षे गंगानदीच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत आणि त्याचा बराच परिणामही जाणवत आहे, तसा प्रयत्न यमुना नदीसाठी कुणी करतांना दिसत नाही, हे भारतियांना लज्जास्पद आहे. गंगानदी इतकेच यमुनेलाही महत्त्व असतांना त्याकडे होणारे दुर्लक्ष अक्षम्य आहे. राज्य सरकार प्रयत्न करत नाहीत, तर आता केंद्र सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच ज्या भाजपशासित राज्यांतून यमुना प्रवाहित होते, त्या राज्यांनी तरी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे हिंदूंना वाटत आहे. असा प्रयत्न सरकारे करतील, ही अपेक्षा !