सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून प्रतिदिन कोरोनाविषयी दिला जाणारा अहवाल बोगस !
भाजपचे आमदार नितेश राणे यांचा गंभीर आरोप
|
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ नोव्हेंबरपासून आजपर्यंत २ सहस्र आर्.टी.पी.सी.आर्. चाचण्या करण्यात आल्या; मात्र त्याचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. ते नागरिक समाजात फिरत आहेत. यातील ज्यांचा अहवाल ‘सकारात्मक’(पॉझिटिव्ह) येईल, त्यांच्याकडून इतरांना संसर्ग झाला, तर त्याला उत्तरदायी कोण ? त्यामुळे प्रशासनाकडून प्रतिदिन कोरोना चाचणी केल्याचा दिला जाणारा अहवाल बोगस आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. येथील ‘ओम गणेश’ या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार नितेश राणे पुढे म्हणाले,
१. कोरोनाच्या काळात आरोग्य खात्यासाठी साहित्याच्या झालेल्या खरेदीचे ‘ऑडिट’ झाले पाहिजे.
२. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग लागून कोरोनाचे उपचार चालू असलेले रुग्ण दगावले आहेत. अशी घटना भविष्यात जिल्हा रुग्णालयात होऊ शकते; कारण कोरोनाच्या काळात साहित्याची जी खरेदी झाली, याविषयी प्रश्नचिन्ह आहे.
३. कोट्यवधी रुपयांच्या साहित्याची खरेदी झाल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र त्यातील बहुतेक गोष्टी केवळ कागदावरच आहेत. प्रत्यक्षात काहीही नाही.
४. कोरोनाच्या काळात साहित्याची जी खरेदी झाली, त्याविषयी ‘श्वेतपत्रिका’ निघाली पाहिजे. त्याचा प्रारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून करावा. पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वत:हून ही श्वेतपत्रिका घोषित करावी.
५. कोरोनाच्या काळात खरेदी करण्यात आलेले साहित्य दाखवले पाहिजे; मात्र शासन आणि प्रशासन असा पारदर्शक कारभार करू शकणार नाहीत.