ग्रामसेवकांना ‘भामटे आणि हरामखोर’ म्हणून अपकीर्ती करणारे आमदार संजय शिरसाट यांच्या निषेधार्थ ग्रामसेवकांचे ‘काम बंद’ आंदोलन
आमदार शिरसाट यांच्यावर फौजदारी कारवाई होण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांना दिले निवेदन
सिंधुदुर्ग – ग्रामसेवकांना ‘भामटे आणि हरामखोर’ आदी अपशब्द वापरून, तसेच चिथावणीखोर वक्तव्य करून सरपंच अन् ग्रामसेवक यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न औरंगाबाद (संभाजीनगर) येथील आमदार संजय शिरसाट यांनी केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने केला आहे. आमदार शिरसाट यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामसेवकांनी ९ नोव्हेंबरला ‘काम बंद’ आंदोलन केले, तसेच आमदार शिरसाट यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी ग्रामसेवक संघटनेच्या सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशासन आणि पोलीस ठाणे यांना एका निवेदनाद्वारे दिली आहे. (एक लोकप्रतिनिधी असे अपशब्द वापरून प्रशासकीय अधिकार्यांना अपकीर्त करत असेल, तर जनता त्यांच्याकडून काय आदर्श घेणार ? लोकप्रतिनिधींची कृती ही नेहमी आदर्श असली पाहिजे, हेही ठाऊक नसलेल्यांना लोकप्रतिनिधी म्हणता येईल का ? – संपादक)
या निवेदनात म्हटले आहे की, विधानसभेच्या संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघाचे आमदार शिरसाट यांनी ८ नोव्हेंबर २०२१ या दिवशी संभाजीनगर येथे ‘सरपंच प्रशिक्षण कार्यशाळे’त भाषण करतांना शासकीय व्यासपिठावरून ग्रामसेवकांना ‘भामटा’, ‘हरामखोर’ इत्यादी अपशब्द वापरून अपकीर्ती केली, तसेच गावाचा विकास करण्यात सरपंच अन् ग्रामसेवक यांच्या असलेल्या संयुक्त दायित्वाचे भान न ठेवता दोघांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने ‘ग्रामसेवक तुमचा नोकर आहे. तो तुमच्या हाताखाली काम करतो. त्याचे ऐकू नका’, असे दायित्वशून्य विधान केले. तसेच चिथावणीखोर भाषण करून संपूर्ण महाराष्ट्रात चुकीचा संदेश देऊन ग्रामसेवकांविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे राज्यात सर्वत्र ग्रामसेवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आमदार शिरसाट यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १०७, २८८, २९४, ५०४, ५०६ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करावा अन्यथा ‘कामबंद’ आंदोलनाचे रूपांतर मोठ्या आंदोलनात केले जाईल.