राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या दिवाळीनिमित्तच्या कार्यक्रमात कलाकार सपना चौधरीचा नाच !

महाराष्ट्रातील समस्यांकडे मुंडेंचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांकडून टीका

विनायक मेटे आणि धनंजय मुंडे

बीड – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीनिमित्त परळी, बीड येथे ‘स्नेहमीलन आणि फराळ’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हरयाणाच्या कलाकार सपना चौधरी यांचा नाचाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. एकीकडे महाराष्ट्रात शेतकर्‍यांना हानीभरपाई मिळालेली नाही, एस्.टी. कर्मचारी आत्महत्या करत आहेत. अशा परिस्थितीत या नाचाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. (नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून नाचाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे नेते कधीतरी जनहित साधू शकतील का ?  – संपादक)

या संदर्भात भाजपचे नेते आणि ‘शिवसंग्राम’ पक्षाचे संस्थापक विनायक मेटे यांनी ‘राज्यात अनेक गंभीर प्रश्न असतांना एका मंत्र्याला असे कार्यक्रम ठेवणे शोभते का ? सामाजिक मंत्र्यांचे भान हरवले आहे का ? धनंजय मुंडे हे सामाजिक खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी आपल्या पदाचे भान राखायला हवे’, अशी टीका केली आहे.