राफेल विमान खरेदीमध्ये मध्यस्थाला देण्यात आले ६५ कोटी रुपये ! – फ्रान्समधील वृत्तसंकेतस्थळ ‘मीडिया पार्ट’चा दावा

कागदपत्रे असतांनाही सीबीआयने चौकशी केली नसल्याचा आरोप !

राफेल विमान

नवी देहली – फ्रान्सचे विमान निर्माता आस्थापन असणार्‍या ‘डसॉल्ट’ने भारताला आणि भारतीय ‘एजन्सीं’ना ३६ राफेल लढाऊ विमाने विकण्याचा करार करण्यासाठी मध्यस्थांना अनुमाने ६५ कोटी रुपये दिले. सुशेन गुप्ता याला दलाली देण्यात आली. कागदपत्रे असूनही भारताची अन्वेषण संस्था सीबीआयने या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा न करण्याचा निर्णय घेत तपास चालू केला नाही, असे वृत्त फ्रान्समधील वृत्तसंकेतस्थळ ‘मीडिया पार्ट’ने प्रसिद्ध केले आहे. राफेल विमान सौद्याच्या प्रकरणी ‘मीडिया पार्ट’ने दिलेल्या वृत्तामुळे फ्रान्सला जुलैमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्यास भाग पडले होते.

या वृत्तामध्ये राफेल लढाऊ विमानांच्या ५९ सहस्र कोटी रुपयांच्या करारामध्ये  भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वृत्तात या वृत्तसंकेतस्थळाने सदर कराराच्या कथित खोट्या पावत्या प्रकाशित केल्या आहेत.