भारतात ३३ लाखांहून अधिक बालके कुपोषित !

३३ पैकी १७ लाख ७० सहस्र बालके तीव्र कुपोषित

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने केलेली ही प्रगती म्हणायची का ? देशातील बालकांना कुपोषित ठेवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी देहली – देशात ३३ लाखांहून अधिक बालके कुपोषित आहेत. त्यांपैकी  निम्म्याहून अधिक बालके तीव्र कुपोषित श्रेणीत येतात, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. अंगणवाडी व्यवस्थेतल ८ कोटी १९ लाख बालकांमध्ये केवळ ३३ लाख बालके कुपोषित आहेत. ज्यांचे सरासरी प्रमाण एकूण बालकांच्या केवळ ४.०४  टक्के इतके आहे.

१. २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यांच्या आकड्यांतून एकूण ३३ लाख २३ सहस्र ३२२ बालकांचा आकडा समोर आला आहे. १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत देशात १७ लाख ७६ सहस्र ९०२ बालके तीव्र कुपोषित, तर १५ लाख ४६ सहस्र ४२० बालके अल्प कुपोषित आहेत. कुपोषित बालके असणार्‍या राज्यांमध्ये बिहार, गुजरात आणि महाराष्ट्र ही राज्ये सर्वांत वरच्या स्थानी आहेत.

२. नोव्हेंबर २०२० ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत ९१ टक्के वाढ झाली आहे.

३. कोरोना महामारीमुळे गरिबातील गरीब लोकांचे आरोग्य आणि पोषण संकट आणखी तीव्र होण्याची भीती महिला आणि बालविकास मंत्रालयाने व्यक्त केली आहे. पोषण परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी गेल्या वर्षी विकसित केलेल्या ‘पोषण’ या ‘अ‍ॅप’वर या माहितीची नोंदणी करण्यात आली होती.