हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक सिद्धतेसह साधना करणेसुद्धा आवश्यक आहे ! – सौ. रेवती हरगी, सनातन संस्था

शिवमोग्गा (कर्नाटक) – श्री श्री भवानीदेवीचा आशीर्वाद आणि समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्धता करणे आवश्यक आहे. साधना केल्याने आध्यात्मिक बळदेखील प्राप्त होते. त्यासाठी प्रतिदिन नामजप करावा. नामजपाने आपल्याला चैतन्य मिळते. नियमित साधनेचे प्रयत्न केल्याने प्रतिकूल परिस्थितीतही आनंदात रहाता येते, असे प्रतिपादन सनातनच्या साधिका सौ. रेवती हरगी यांनी काढले. येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा साधना शिबिरात शिबिरार्थींना संबोधित करतांना त्या बोलत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. रमेश होसनगर यांनी शिबिराचा उद्देश सांगितला. साधिका कु. भव्या नायक यांनी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या दैवी कार्यामुळे सनातन संस्था अध्यात्मप्रसार व्यापक रितीने कशी करत आहे ?’, याविषयी युवा शिबिरार्थींना अवगत केले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सौम्या मोगेर यांनी हिंदु धर्मावर होत असलेले आघात, त्याचे परिणाम आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी करत असलेले प्रयत्न यांविषयी माहिती दिली. कु. अन्नपूर्णा यांनी शिबिराचे सूत्रसंचालन केले.

क्षणचित्रे

  • युवा शिबिरार्थींमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी धर्मशिक्षणाशी संबंधित विषय मांडण्यास सांगण्यात आले. शिबिरार्थींनी या सत्रात उत्साहाने सहभाग घेतला.
  • ‘कोरोनामुळे मनात येणार्‍या नकारात्मक विचारांविषयी दृष्टीकोन कसा ठेवायचा ? आणि कोरोनाच्या दृष्टीने आपण कोणती काळजी घेतली पाहिजे’, याविषयी चर्चेच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले.

अभिप्राय

  • ‘शिबिरामुळे मला पुष्कळ विषय शिकायला मिळाले. आमच्या राष्ट्रपुरुषांच्या त्यागाविषयी माहिती मिळाली. हिंदु राष्ट्राविषयी उत्साह वाढला. मी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करीन. या शिबिरात साधकांच्या सहवासात मला शांत आणि समाधानी वाटले.’ – कु. काव्यश्री मंजुनाथ (वय २१ वर्षे), सागर, कर्नाटक
  • ‘शिबिरात साधना आणि नामजप यांचे महत्त्व समजले. असे शिबिर पुन्हा पुन्हा झाले, तर साधनेला प्रोत्साहन मिळून आमचा उत्साह वाढेल. – श्री. लोकप्रसाद वेलुस्वामी (वय १९ वर्षे), शिवमोग्गा