जनता धर्मनिष्ठ नसल्यास तिला कायद्याच्या साहाय्यानेच नियमांचे पालन करण्यास भाग पाडावे लागते !
धर्मयात्रेच्या निमित्ताने मी ज्या देशांना भेटी दिल्या, त्या देशांमध्ये (नेपाळ सोडून) रहाणारे सर्व भारतीय त्या देशातील वाहतूक नियमांचे पालन करत असल्याचे मला आढळून आले. तेव्हा मी तेथील भारतियांना विचारले, ‘‘येथे रहाणारे सर्व भारतीय सतर्कतेने सर्व नियमांचे पालन करतांना दिसत आहेत. यामागील कारण काय आहे ?’’ सिंगापूर, थायलंड, दुबई, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि इटली इत्यादी ठिकाणी रहाणार्या सर्व भारतियांनी एकच गोष्ट सांगितली, ‘‘येथे नियमांचे पालन केले नाही, तर कठोर दंड भोगावा लागतो.’’
हे ऐकून मला धर्माचा एक सिद्धांत आठवला. ‘धर्माप्रमाणे योग्य आणि प्रशंसनीय कृती करणार्याला पारितोषिक देणे अन् अयोग्य कर्म करणार्याला दंड करणे.’ जे शासन या सिद्धांताचे कठोरपणे पालन करवून घेते, तेथील समाज शिस्तप्रिय रहातो. याउलट स्वतंत्र भारतात ज्यांच्यामुळे ही भ्रष्ट व्यवस्था आम्हाला पहायला मिळत आहे, त्या राजकारण्यांना धर्माच्या या मूलभूत सिद्धांताचा विसर पडला आहे.
लक्षात ठेवा, धर्मपरायण जनताच राज्याने ठरवून दिलेल्या कायद्यांचे संपूर्ण निष्ठेने पालन करते. जनता धर्मनिष्ठ नसली, तर तिला कायद्याच्या साहाय्यानेच नियमांचे पालन करण्यास भाग पाडता येते. याशिवाय जनतेकडून नियमांचे पालन करून घेण्यासाठी दुसरा पर्याय नाही.
– पू. तनुजा ठाकूर (१.११.२०२१)