राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी त्याग करणे आवश्यक !

कु. मधुरा भोसले

१. राष्ट्ररचना आणि धर्मसंस्थापना यांसाठी भोगी वृत्तीच्या नव्हे, तर त्यागी वृत्तीच्या नागरिकांची आवश्यकता असणे

‘कोणतेही विधायक कार्य करण्यासाठी त्या कार्याशी एकरूप होऊन कार्यपूर्तीसाठी तळमळीने आणि झोकून देऊन प्रयत्न करणे आवश्यक असते. असे प्रयत्न करण्यासाठी भोगी वृत्तीची नव्हे, तर त्यागी वृत्तीची आवश्यकता असते. त्यागी वृत्तीच्या पायावरच विधायकार्याची इमारत उभी राहू शकते.

२. राज्यकर्त्यांनी विविध आश्वासने देऊन समाजाला भोगी आणि विलासी बनवणे

विविध सुविधांची प्राप्ती आणि विविध मागण्यांची पूर्ती होण्यासाठी समाजातील मतदार गट सातत्याने प्रयत्नरत असतो. अशा नागरिकांना राज्यकर्त्यांनी प्रथम राष्ट्रहित साधणे महत्त्वाचे असल्याने स्वत:च्या मागण्या बाजूला ठेवून राष्ट्ररचनेच्या कार्यासाठी प्रयत्नशील होण्यासाठी उद्युक्त करायला हवे; परंतु राज्यकर्ते स्वार्थी वृत्तीचे असल्यामुळे ते समाजातील मतदारांना घडवण्याऐवजी त्यांना विविध आश्वासने देऊन भुलवण्याचा प्रयत्न करतात. ‘कोणताही त्याग न करता केवळ इच्छित उमदेवाराला निवडून दिले की, आपल्या सर्व मागण्या पूर्ण होतात’, हा चुकीचा संस्कार नागरिकांच्या मनावर होतो. त्यामुळे नागरिक त्यागी वृत्तीचे न बनता भोगी आणि विलासी वृत्तीचे बनतात.

३. जागृत नागरिकाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मतदारांनी आश्वासनांची खैरात करणार्‍या राज्यकर्त्यांना नव्हे, तर राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत करणार्‍या उमेदवारांना शासनकर्ते म्हणून निवडून देणे आवश्यक असणे

सुदृृढ समाज आणि बलशाली राष्ट्र यांची निर्मिती करायची असेल, तर प्रथम प्रत्येक नागरिकाने स्वार्थाचा त्याग केला पाहिजे. स्वार्थ संपल्यावरच परमार्थाचा प्रारंभ होऊ शकतो. त्यामुळे मतदारांनी आश्वासनांच्या खैरातीला भुलून न जाता एकूण उमेदवारांपैकी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी उमेदवार कोण आहेत ? त्यांना शोधून काढावे. मतदारांनी जागृत नागरिकाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी उमेदवारांना एकगठ्ठा मते देऊन बहुमताने निवडून आणावे. असे झाले तरच समाजकल्याण आणि राष्ट्रोन्नती होऊ शकेल.

४. नि:स्वार्थी आणि निरपेक्ष वृत्तीचे शासनकर्ते अन् प्रजा हीच हिंदु राष्ट्राची भूषणे असणे !

हिंदु राष्ट्रात स्वार्थी आणि संकुचित वृत्तीच्या राज्यकर्त्यांना अजिबात स्थान नसेल. तेथे सेवावृत्तीने समाजसेवा आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरून अखंड राष्ट्रसेवा करणारे राज्यकर्ते असतील. हिंदु राष्ट्रात नि:स्वार्थी आणि निरपेक्ष वृत्तीचे राज्यकर्ते हेच राष्ट्राचे भूषण असतील. त्यामुळे त्यांचे अनुसरण करणार्‍या प्रजेचीही वृत्ती त्यागी बनेल. अशा प्रकारे त्यागाच्या पायावर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची रचना केली जाईल.

५. हिंदु राष्ट्रामध्ये आदर्श राजासह आदर्श प्रजाही पहावयास मिळणार असणे

स्वत: त्याग करून स्वत:चा आदर्श प्रजेपुढे मांडणार्‍या आणि राजधर्माचे कठोर पालन करणार्‍या शासनकर्त्यांचे दर्शन केवळ हिंदु राष्ट्रातच घडेल. हिंदु राष्ट्रातील राज्यकर्ते राजधर्माचे आदर्श असतील आणि ते प्रजेला वेळोवेळी आवश्यक ती शिकवण देऊन राजधर्माचे तंतोतंत पालन करतील. राजधर्माचे आचरण करणार्‍या शासनकर्त्यांमुळे आदर्श समाजाची रचना होऊन हिंदु राष्ट्रामध्ये आदर्श राजासह आदर्श प्रजाही पहावयास मिळेल.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.५.२०१७, रात्री ९.५१)