धाराशिव येथे एस्.टी. कर्मचार्यांचे बेमुदत ‘कामबंद’ आंदोलन चालू !
धाराशिव – विविध मागण्यांसाठी एस्.टी. कर्मचारी, वाहक आणि चालक यांनी बेमुदत ‘कामबंद’ आंदोलन चालू केले आहे. वेळेवर मानधन मिळत नाही, तसेच मानधन तुटपुंजे असल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कर्मचार्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलनाच्या वेळी महिला आंदोलकांना अश्रू अनावर झाले होते.
जिल्ह्यातील ६ बस आगारांपैकी ५ आगार आंदोलनामुळे बंद असून परिवहन मंडळाची ३० लाख रुपयांची उलाढाल थांबली आहे. कर्मचार्यांच्या कामबंद आंदोलनामुळे ७ नोव्हेंबरपासून एकही बस डेपोतून बाहेर पडली नाही, त्यामुळे दीवाळी संपवून परतीच्या प्रवासाला जाणार्या प्रवाशांची अडचण झाली होती.
कोरोना संसर्गाच्या काळात ३५० कर्मचार्यांचा मृत्यू झाला; मात्र त्यांना कसलेही साहाय्य लाभले नाही. त्यांच्यासाठी ५० लाख रुपयांचा विमा घोषित केला होता; मात्र तोही त्यांच्यापर्यंत पोचला नाही. आतापर्यंत ३५ एस्.टी. कर्मचार्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, तर ७० टक्के कर्मचारी हे कर्जबाजारी आहेत.