वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे २ अल्पवयीन बहिणींचा विवाह लावल्याच्या प्रकरणी आई-वडिलांसह ४ जणांवर गुन्हा नोंद !
वैजापूर – अल्पवयीन मुलीचे सावत्र वडील आणि त्याचे मित्र यांनी लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या कुटुंबातील २ अल्पवयीन मुलींचा आई-वडिलांसह इतरांनी २ गुजराथी व्यक्तींशी (बाल)विवाह लावून दिल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांसह फरजाना आणि वहाब यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
मोंढा मार्केट परिसरात एका १४ वर्षीय मुलीचे सावत्र वडिलांसह अन्य एकाने लैंगिक छळ केल्याचे प्रकरण ४ दिवसांपूर्वी घडले होते. महिला पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी गुन्ह्याचे अन्वेषण चालू केले. तेव्हा याच कुटुंबातील २ अल्पवयीन मुलींचा एक महिला आणि मालेगाव येथील एक दलाल यांच्या माध्यमातून दोघांशी विवाह लावून दिला, अशी माहिती पीडित अल्पवयीन मुलींनी पोलिसांना दिली.
या दोन्ही प्रकरणांत स्थानिक पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुली आणि त्यांचे नातेवाईक यांची तक्रार प्रविष्ट करून न घेता त्यांना हुसकावून लावले. (तक्रार प्रविष्ट करून न घेणारे पोलीस जनतेचे रक्षक म्हणता येतील का ? अशा पोलिसांविषयी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणे आवश्यक आहे. अशा पोलिसांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक)