हिंदूंना संरक्षण देणे, संघ शाखांचा विस्तार करणे आणि हिंदुहिताचा मार्ग प्रशस्त करणे यांवर भर देण्यात येणार !
सरसंघचालक मोहन भागवत यांचा बंगाल दौरा
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या दौर्यावर जाणार आहेत. निवडणुकीनंतर ते प्रथमच बंगाल राज्याच्या दौर्यावर जात आहेत. विशेषत: संघाच्या दसरा उत्सवात बोलतांना डॉ. भागवत यांनी पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या हत्या आणि अल्प लोकसंख्या यांमुळे होणार्या हिंदूंच्या पलायनाविषयी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौर्याला विशेष महत्त्व आहे. बंगालमधील हिंदूंना संरक्षण देणे, संघ शाखांचा विस्तार करणे अन् विविध क्षेत्रांतील विचारवंतांशी चर्चेतून हिंदुहिताचा मार्ग प्रशस्त करणे, यांवर या दौर्यात त्यांचा भर रहाणार असल्याचे समजते. बंगाल दौर्यात सरसंघचालक संघाच्या क्षेत्र आणि प्रांत प्रचारक यांची बैठक घेतील, तसेच बंगालमधील प्रबुद्ध जनांशी संवादही साधणार आहेत.
हिंदूंची संख्या अल्प होऊन मुसलमान आणि ख्रिस्ती यांची लोकसंख्या वाढली !
‘पूर्वी देशात ८८ टक्के हिंदू होते. त्यात घट होऊन हे प्रमाण ८३.८ टक्के झाले, तर मुसलमानांची लोकसंख्या ९.८ टक्क्यांवरून वाढून ती १४.२३ टक्क्यांवर गेली आहे. मणीपूरमध्ये ख्रिस्ती धर्मियांची लोकसंख्या १३ टक्क्यांनी वाढली आहे. आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार यांसारख्या राज्यांत मुसलमान लोकसंख्येतील वाढ ही राष्ट्रीय लोकसंख्या वृद्धीच्या सरासरीहून अधिक असल्याचे दिसून येते. यावरून बांगलादेशातून होणारी घुसखोरी सिद्ध होत आहे’, असे डॉ. भागवत यांनी सांगितले होते. देशात वर्ष १९५७ आणि वर्ष २०११ या जनगणनांची तुलना करता आकड्यांमधील भेद स्पष्ट होतो.
घुसखोरी आणि हिंदूंचे धर्मांतर यांमुळे लोकसंख्येचे धर्माधारित असंतुलन ! – सरसंघचालक
‘परदेशातून होणारी घुसखोरी आणि देशातील हिंदूंचे होणारे धर्मांतर यांमुळे लोकसंख्येचे धर्माधारित असंतुलन निर्माण होत आहे. हा प्रकार देशासाठी घातक असून यातून गंभीर संकटे निर्माण होऊ शकतात’, असे सुतोवाच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपूर येथे आयोजित संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात बोलतांना केले होते.