साधकांनाच नव्हे, तर साधनेत नसणार्‍यांनाही लीलया ईश्वराशी जोडणारे कृपावत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधक प्रसार करून समाजातील लोकांना साधनेचे महत्त्व पटवून देतात आणि काही कालावधीने जिज्ञासू साधना करण्यास आरंभ करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सांगणे, हे चैतन्याच्या स्तरावर असल्याने जिज्ञासूच्या अंतर्मनात साधनेचे बीज रोवले जाऊन त्याच्या मनात त्वरित पालट होतो अन् तो लगेच साधना करण्याचा निर्णय घेतो. काही वेळा एखादा पूर्णवेळ साधना करणारा साधक साधना सोडून जातो, तेव्हा काही साधक ‘त्याने साधना सोडायला नको होती’; म्हणून हळहळतात; पण या संदर्भात द्रष्ट्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन कसा असतो ? आणि एखाद्या कुटुंबातील तीव्र शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक कारणांमुळे कुणीही साधना करूच शकणार नाही, अशा स्थितीतही भक्तवत्सल गुरुमाऊली त्यांचा सांभाळच नव्हे, तर त्यांच्या घरात दैवी पालट कसे घडवून आणते ? हे पुढील उदाहरणांतून सर्वांच्या लक्षात येईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. विजय डगवार, वर्धा

१ अ. एका सत्संगात डगवारकाकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बरेच प्रश्न विचारणे, परात्पर गुरुदेवांनी त्यांना उत्तरे देणे आणि नंतर साधकांनी या उत्तरांप्रमाणेच निर्णय घेतल्याने त्यांना लाभ झाल्याचे त्यांच्या अनुभूतीतून लक्षात येणे

‘१४.६.२०२१ या दिवशी विजय डगवार यांचे निधन झाल्याचे वृत्त मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचले. त्या वेळी ‘मला ते पूर्वी एकदा रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी परात्पर गुरुदेवांच्या सत्संगात आम्ही एकत्र होतो’, ते दृश्य आठवले. त्या सत्संगात श्री. डगवारकाका प.पू. गुरुदेवांना बरेच व्यावहारिक प्रश्न विचारत होते. प.पू. गुरुदेवांनी त्यांना त्यांच्या स्थितीनुसार योग्य ती उत्तरेही दिली. पुढे जेव्हा अन्य साधक त्यांच्या अनुभूती सांगत होते, त्या काकांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुरोधानेच होत्या. त्या अनुभूतीतून ‘साधकांना कसा लाभ झाला ?’, हे सहज लक्षात येत होते.

कै. विजय डगवार

१ आ. ‘परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून डगवारकाकांच्या मनावर असलेले मायेचे संस्कार पुसत असून त्यांच्याशी साधनेविषयी बोलतांना पुसलेल्या संस्काराच्या ठिकाणी नवीन साधनेचे संस्कार निर्माण करत आहेत’, असे दिसणे आणि ‘सत्संगाच्या शेवटी काकांनी ते स्वतः रामनाथीला येणार आहेत’, असे गुरुदेवांना सांगणे

‘साधक अनुभूती सांगत असतांना परात्पर गुरुदेव मध्ये मध्ये काकांना म्हणत होते, ‘‘साधकांना कशा अनुभूती येतात, त्या ऐकल्यात ना !’’ सत्संग संपेपर्यंत डगवारकाका आणि गुरुदेव यांच्यामधे जसजसा संवाद होत होता, तसतसे ‘परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून काकांच्या मनावर असलेले मायेचे संस्कार पुसत आहेत’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसत होते. एखादी व्यक्ती फळ्यावर लिहिलेले ‘डस्टर’ने (फळ्यावर लिहिलेले पुसायचा ठोकळा) पुसते, तसेच दृश्य मला दिसत होते. त्या वेळी प.पू. गुरुदेव ‘काकांच्या मनाची साधनेच्या दृष्टीने सिद्धता करून घेत आहेत’, असेही माझ्या लक्षात आले. प.पू. गुरुदेव मधे मधे त्यांचे नाव घेऊन साधनेच्या संदर्भात काही सूत्रे सांगत होते. त्या वेळी ‘ते पुसलेल्या संस्काराच्या ठिकाणी साधनेचा नवीन संस्कार निर्माण करत आहेत’, असे मला जाणवले. हे दृश्य ‘बी मातीत पेरावी’, त्याप्रमाणे दिसत होते. सत्संगाच्या शेवटी काकांना साधनेची सूत्रे पटल्याने ते म्हणाले, ‘‘आता मी इकडेच (साधना करण्यासाठी रामनाथीला) येईन.’’ तेव्हा काकांच्या मनःपटलावर छोटी छोटी सोनेरी रंगाची कोवळी रोपे अंकुरल्याचे मला दिसले.

१ इ. गुरुदेवांच्या सत्संगानंतर काका रामनाथी आश्रमात रहाणे आणि त्यांची मायेतील आसक्ती न्यून झाल्याचे जाणवणे

या सत्संगानंतर काका रामनाथी आश्रमात राहिले होते. तेव्हा प.पू. गुरुदेवांच्या सत्संगाच्या माध्यमातून काकांचे मायेतील विचार आणि आसक्ती अल्प कालावधीत न्यून झाल्याचे जाणवले. त्यामुळे काही काळ आश्रमात राहून काकांनी आनंदाने पुढील साधना समजून घेतली.

या सर्व प्रसंगाचे स्मरण होतांना ‘कै. डगवारकाकासुद्धा गुरुदेवांच्या चरणांशीच आहेत आणि त्यांची पुढील साधना गुरुदेव करवून घेत आहेत’, असे जाणवून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. रामनाथी (गोवा) आश्रमाचे बांधकाम करण्यासाठी येणारा कामगार

२ अ. रामनाथी आश्रमाचे बांधकाम चालू असतांना परात्पर गुरुदेव एका कामगाराजवळून जातांना त्याने गुरुदेवांना भावपूर्ण नमस्कार करणे आणि त्याला गुरुदेव ‘संत किंवा गुरु आहेत’, याविषयी ठाऊक नसणे

वरील लिखाण टंकलेखन करतांना मला पूर्वीचा एक प्रसंग आठवला. तेव्हा गोवा येथील रामनाथी आश्रमाचे बांधकाम चालू होते. अनेक कामगार बांधकामानिमित्त आश्रमात यायचे. त्या वेळी परात्पर गुरुदेव सकाळी बांधकाम सेवेचे निरीक्षण करायचे. एकदा एका कामगाराजवळून जातांना त्याने परात्पर गुरुदेवांना भावपूर्ण नमस्कार केला. तो कन्नड भाषिक होता. त्याला ‘परात्पर गुरुदेव संत किंवा गुरु आहेत’, असे ठाऊक नव्हते. त्याला काहीतरी जाणवले आणि त्याने त्यांना भावपूर्ण नमस्कार केला. तेव्हा परात्पर गुरुदेव बराच वेळ त्याच्यासमोर थांबले.

२ आ. कामगार शिवभक्त असून त्याला ‘शिवाचा नामजप कसा करायचा ?’, हे परात्पर गुरुदेवांनी सांगणे, तेव्हा ‘त्याच्या हृदयात नीलबिंदू निर्माण होऊन मन निळे झाले आहे’, असे साधिकेला दिसणे आणि कामगाराचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप सतत होत असून तो आताही चालू असणे

तो कर्नाटक राज्यातील असून शिवभक्त होता. परात्पर गुरुदेवांनी त्याला मराठीतून ‘शिवाचा नामजप कसा करायचा ?’, हे सांगितले. तेव्हा ‘त्याच्या हृदयात एक नीलबिंदू निर्माण झाला. नंतर त्या नीलबिंदूचे वेगाने एका, दोन, तीन अशा अनेक चक्रांत रूपांतर होऊन त्याचे मनही निळे निळे झाले’, असे मला दिसले. हे सर्व इतके वेगाने झाले की, ‘एखादे दृश्य देवाने ‘फास्ट फॉरवर्ड’ (एखाद्या चलत्चित्राला वेगाने पुढे नेणे) करावे, त्याप्रमाणे प्रत्यक्षात हे एका क्षणात सगळे झाले.’ दुसर्‍या दिवशी त्याने कन्नड भाषिक साधकाच्या माध्यमातून गुरुदेवांना सांगितले की, ‘त्याचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप सतत होत होता आणि आताही चालू आहे.’ परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याला शिव ग्रंथ, नामपट्टी आणि खाऊही दिला होता. पुढे त्या कामगाराला आश्रमात काम करण्याने आध्यात्मिक स्तरावर लाभ होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो अधिक पैसे मिळणार्‍या ठिकाणी काम करण्यासाठी न जाता आश्रमातच कामाला येत असे. तो त्याच्या समवेत कुटुंबियांनाही आश्रमात काम करण्यासाठी घेऊन येत असे.

३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया न पटलेल्या साधकाने साधना सोडल्यावर ‘त्याला साधना समजली आहे, पुढे साधना करील’, असा दृष्टीकोन ठेवून त्याच्याकडे साक्षीभावाने पहाणे

काही वर्षांपूर्वी एक साधक पूर्णवेळ साधना करत होता. त्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात ‘ते विष्णु, श्रीकृष्ण आणि श्रीराम आहेत, सप्तदेवता त्यांच्या अधीन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निर्गुण तत्त्व कार्यरत असते’, अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया न पटल्याने त्याने साधना सोडली. त्याच्याविषयी मी परात्पर गुरुदेवांना प्रश्न विचारला की, एवढ्या अविस्मरणीय अनुभूती येऊनही आणि ‘तुम्ही परमेश्वर आहात’, हे जाणूनही त्याने साधना कशी सोडली ? परमेश्वराला पाहूनही त्याला परत ‘व्यावहारिक जीवन जगावे’, असे का वाटले ? त्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘त्याच्या मनात साधनेचा संस्कार होऊन साधनेचे बीज निर्माण झाले आहे. तो आज नाहीतर उद्या, काही दिवसांनी, काही आठवड्यांनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी किंवा अगदीच जमले नाही, तर पुढच्या जन्मात साधना करील. आपण त्याचा विचार नको करायला. आपण आपली साधना करत पुढे जाऊया.’’

(साधना कुणी, किती आणि कशा प्रकारे केली, हे त्याचे प्रारब्ध अन् संचित यांवर अवलंबून असते. एखाद्याच्या प्रारब्धानुसार त्याच्यात साधनेत प्रगती करण्याचे योग नसतील, तर ‘त्याला त्याचे प्रारब्ध भोगू देणे’, हा त्याच्याकडे पहाण्याचा एक उद्देश असतो. त्याचबरोबर स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हा साधनेचा पाया आहे; कारण देवाची कितीही भक्ती केली, तरी पुढे स्वभावदोष किंवा अहं यांच्या तीव्रतेनुसार मध्ये मध्ये ते उफाळून येतात अन् साधनेत दोन पावले मागे येणे किंवा घसरणही होऊ शकते. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियाच मान्य नसणार्‍याला त्याच्या प्रारब्धावर सोडणे अन् पुन्हा त्याच्या अंतर्मनातील साधनेच्या बिजाप्रमाणे त्याची साधना करण्याची इच्छा होईल, तेव्हा त्याला साधनेत साहाय्य करणे क्रमप्राप्त असते. – संकलक)

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

४. तीव्र प्रारब्ध आणि आध्यात्मिक त्रास असणार्‍या कुटुंबाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वतोपरी साहाय्य करून त्याच्या घरातील वातावरण दैवी करणे आणि कुटुंबियातील एकाची आधात्मिक उन्नतीही करवून घेणे

एका कुटुंबात कुणालाही अपेक्षित यश न मिळणे, अनेक कौटुंबिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास असणे, जीवघेणे अपघात होणे अन् सर्वांचे तीव्र प्रारब्ध यांमुळे घरातील वातावरण नेहमी तणावाचे आणि स्थिती पाताळासम असायची. या कुटुंबातील घडणार्‍या घटना आणि प्रसंग यांमागे आध्यात्मिक कारण होते. अशा स्थितीत साधना करणे अशक्यप्राय होते. कुटुंबातील एकाने वर्ष १९९८ मध्ये साधनेला आरंभ केल्यानंतर केवळ गुरुकृपेनेच घरातील वातावरणात हळूहळू पालट होत गेले. सर्वांना प्रारब्ध सहन करणे सुसह्य झाले. जीवघेण्या अपघातातही सर्व जण जिवंत आहेत. कुटुंबातील दोन सदस्य पूर्णवेळ साधना करत आहेत आणि अन्य सदस्य अल्प-अधिक प्रमाणात साधना करत आहेत. आज २२ वर्षांनंतरची घराची स्थिती विचारात घेतली, तर घरातील वातावरण साधनामय आणि दैवी झाले आहे. कुटुंबातील एकाने तीव्र त्रासातही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. हे केवळ गुरुकृपेनेच, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच शक्य झाले आहे.

‘मंद प्रारब्ध मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध तीव्र साधनेने पालटते आणि तीव्र प्रारब्ध असल्यास केवळ गुरुकृपेनेच पालट घडू शकतो’, याची प्रचीती सर्वांनी घेतली. परात्पर गुरु डॉक्टरांनी कुटुंबियांवर अपार कृपा करून सर्वांना त्यांच्या स्थितीनुसार ईश्वराशी जोडून ठेवल्यामुळे ते त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहेत.’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०२१)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक