पर्यावरण दाखला न मिळवल्याने धारगळ, पेडणे येथील ‘आयुष’ रुग्णालयाला २३ लक्ष रुपयांचा दंड
याला उत्तरदायी असणार्यांकडून हा खर्च शासनाने वसूल करावा ! जनतेच्या म्हणजेच शासनाच्या पैशांतून हा दंड भरायला नको ! – संपादक
पणजी, ७ नोव्हेंबर (वार्ता.) केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत धारगळ, पेडणे येथे बांधण्यात येत असलेल्या ‘आयुष’ रुग्णालयाचे बांधकाम चालू करण्यापूर्वी पर्यावरण दाखला मिळवण्यात आला नसल्याने गोवा राज्य पर्यावरण परिणाम छाननी प्राधिकरणाने (जी.एस्.ई.आय.ए.ए.)‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्थे’ला २३ लक्ष रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकल्पाचा खर्च २३० कोटी रुपये दाखवण्यात आला आहे. एकूण खर्चाच्या १ टक्का म्हणजेच २३ लक्ष रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
या ठिकाणी कंत्राटदाराकडून कामगारांना निवासासाठी व्यवस्थित सोय करण्यात आलेली नाही, तसेच स्वच्छतेविषयी मोठी गैरसोय असल्याने कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न जटील बनला आहे. ‘जी.एस्.ई.आय.ए.ए’ची ५ ऑक्टोबर या दिवशी बैठक झाली होती. या बैठकीत दंड ठोठावण्याचा हा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते वर्ष २०१८ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. आधी प्रकल्पाचे काम चालू करून नंतर ऑगस्ट २०२१ मध्ये पर्यावरण अनुज्ञप्तीसाठी अर्ज करण्यात आला. हा अर्ज प्रविष्ट करण्यात आल्यानंतर प्राधिकरणाने केलेल्या पहाणीत प्रकल्पाचे काम यापूर्वीच चालू झाल्याचे निदर्शनास आले. ही गोष्ट पर्यावरण दाखल्याच्या सक्तीचे उल्लंघन करणारी असल्याने हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. हा दंड एका मासाच्या आत भरावा लागणार असल्याचे संस्थेला पाठवण्यात आलेल्या नोटिसीत म्हटले आहे. धारगळ येथे क्रीडा नगरीसाठी संपादन केलेल्या भूमीत ‘आयुष’ रुग्णालय बांधण्यात येत आहे. २ लक्ष चौ.मी. भूमीत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि सिद्ध अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे, तसेच या ठिकाणी १०० खाटांचे रुग्णालयही असेल.