कणकवली तालुक्यातील अवैध व्यवसायांशी पोलिसांच्या असलेल्या हितसंबंधांची चौकशी करा ! – प्रदीप मांजरेकर, तालुकाध्यक्ष, काँग्रेस
कणकवली – तालुक्यात अनेक अवैध व्यवसाय चालू आहेत. याविषयी लोकांनी तक्रारी देऊनही त्याकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या अवैध व्यावसायिकांशी पोलिसांचे काय हितसंबंध आहेत, याची चौकशी करावी. येत्या १५ दिवसांत याविषयी योग्य ती कारवाई न झाल्यास पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री यांच्याकडे न्याय मागू, अशी चेतावणी काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना निवेदनाद्वारे दिली आहे. (अवैध व्यवसायांच्या विरोधात आणि पोलिसांचा नाकर्तेपणा किंवा त्यांचे व्यावसायिकांशी असलेले हितसंबंध यांविषयी आवाज उठवणे योग्यच; पण काँग्रेस महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असतांना काँग्रेसवाल्याना अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील वागदे येथील साईबाबा सोशल क्लबमध्ये नुकतीच कॅरम स्पर्धा आयोजित केली होती. क्लबमध्ये जुगार अड्डा, रमी, ३ पत्ती यांसारखे अवैध व्यवसाय चालतात. या स्पर्धेला येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे आणि पोलीस उपनिरीक्षक शरद देठे उपस्थित राहून प्रोत्साहन देतात. लोकांनी याविषयी तक्रारी करूनही पोलीस दुर्लक्ष करतात. या क्लबमधून पोलिसांना प्रतिमास सहस्रो रुपयांचा हप्ता दिला जात असल्याचे समजते. याविषयी मांजरेकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बागाटे यांच्याशीही चर्चा केली आहे.