सावंतवाडी शहरात केबल टाकण्यासाठी चालू असलेले खोदकाम राष्ट्रवादी काँग्रेसने रोखले  

प्रतीकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – जिओ आस्थापनाने शहरात केबल टाकण्यासाठी खोदलेल्या चरांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. याकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शहरातील सालईवाडा भागात खोदलेल्या चरांमध्ये मेणबत्त्या लावल्या, तर शिरोडा नाका परिसरात चालू असलेले काम रोखून धरले. या वेळी पदाधिकार्‍यांनी ‘बाजारपेठेतील रस्ते अगोदर सुधारा आणि नंतरच कामाला प्रारंभ करा, अशी मागणी केली. (खासगी आस्थापनाच्या कामामुळे जनतेला त्रास होतो, हे राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांना दिसते, तर प्रशासनाला का दिसत नाही ? कि जाणीवपूर्वक काम रेटून नेण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे ? – संपादक) राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक गवस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यापूर्वी २ नोव्हेंबरला माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबन साळगावकर यांनीही शहरात केबल टाकण्यासाठी चालू असलेल्या कामावरून अप्रसन्नता व्यक्त केली होती. ‘हे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे. अशा प्रकारे हे काम चालू राहिल्यास नगरपरिषदेला मोठ्या हानीला सामोरे जावे लागू शकते’, अशी शंका व्यक्त केली होती. याविषयी साळगावकर यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी शिवप्रसाद कुडपकर यांना संपर्क साधून चुकीच्या पद्धतीने चालू असलेले काम थांबवून खोदलेले रस्ते त्वरित बुजवण्याची मागणी केली होती. (एका लोकप्रतिनिधीने उपरोक्त कामातील त्रुटी निदर्शनास आणून देऊनही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते आणि त्या कारणास्तव आठ दिवसांत पुन्हा आंदोलन करावे लागते, याचा अर्थ  संबंधित आस्थापन प्रशासनाला जुमानत नाही, असा तरी होतो किंवा प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करून लोकप्रतिनिधींना जुमानत नाही, असा होतो. जनतेला वस्तूस्थिती समजेल का ? – संपादक)