कार्तिकी वारीसाठी आरोग्य विभागाच्या अनुमतीची आवश्यकता नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
सोलापूर – कोरोनाच्या संसर्गाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची कार्तिकी वारी १५ नोव्हेंबरला (भागवत एकादशीला) होत आहे. त्या वेळी पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी होईल. यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांकडे अनुमतीचा प्रस्ताव पाठवण्याची सिद्धता चालू केली आहे; मात्र राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव न्यून झाल्याने वारीसाठी आता स्वतंत्र अनुमतीची आवश्यकता भासणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ या प्रमुख चार वारींच्या निमित्ताने प्रतिवर्षी ५ ते १० लाखांपर्यंत भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येतात; मात्र राज्यातील कोरोनाच्या संसर्गामुळे १७ एप्रिल २०२० पासून श्री विठ्ठलाची एकही वारी भाविकांच्या उपस्थितीत झाली नाही. कोरोनाच्या दोन्ही लाटेत आषाढी वारीच्या निमित्ताने मानाच्या पालख्या परिवहन महामंडळाच्या साहाय्याने बसमधून पंढरपूर येथे आल्या होत्या. ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यातील १०० टक्के व्यक्तींचा पहिला डोस पूर्ण करण्याचे नियोजन केले जात आहे. १८ वर्षांवरील सर्वांनीच लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी या वेळी केले.