नेरूळ येथे गावदेवी मंदिर परिसरातील मद्यपींना हटकणार्‍या मंदिर विश्वस्तांवर प्राणघातक आक्रमण; आरोपी अटकेत

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी मुंबई, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – नेरूळ येथील गावदेवी मंदिराच्या परिसरातील मद्यपींना हटकणार्‍या मंदिर विश्वस्तांवर मद्यपींकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले. ही घटना ४ नोव्हेंबरच्या रात्री घडली असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नेरूळच्या ‘ग्रामदेवता मंडळ ट्रस्ट’चे विश्वस्त नारायण पाटील हे ४ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता नेहमीप्रमाणे देवीच्या आरतीहून घरी परतत होते. या वेळी त्यांना मंदिराच्या परिसरात दोन मद्यपी मद्य पीत बसले असल्याचे आढळून आले. त्यांनी या दोघांना हटकले असता या मद्यपींनी त्यांच्या डोक्यावर मद्याची बाटली फोडली. रक्तबंबाळ पाटील यांनी आरडाओरडा करताच मद्यपींनी अंधाराचा लाभ घेऊन पळ काढला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले. उपचारानंतर पाटील यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी रतीन आचार्य या आरोपीला अटक केली असून अन्य एका फरार आरोपीचा शोध चालू आहे.

मंदिराचा परिसर विस्तीर्ण असल्याने ‘या ठिकाणी पोलिसांनी नियमित गस्त घालावी आणि भाविकांना मंदिरात ये-जा करण्यास सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे’, अशी मागणी नारायण पाटील यांनी केली आहे.