आध्यात्मिक उन्नतीसाठी साधनेचे प्रयत्न तळमळीने करा ! – सौ. लक्ष्मी पै
सनातन संस्थेच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे युवा साधकांसाठीचे शिबिर भावपूर्ण वातावरणात पार पडले !
मंगळुरू (कर्नाटक) – खरा आनंद आध्यात्मिक साधनेतून मिळतो. नामजपाने आपल्यात सात्त्विकता निर्माण होते. सात्त्विकतेने सद्गुणांची वृद्धी होते. स्वतःतील स्वभावदोषांचे निर्मूलन होण्यासाठी आणि गुणवृद्धी होण्यासाठी साधनेचे प्रयत्न तळमळीने करा, असे आवाहन सनातन संस्थेच्या साधिका सौ. लक्ष्मी पै. यांनी केले. त्या युवा साधकांना संबोधित करत होत्या. येथील बालंभट सभाभवन येथे ३१ ऑक्टोबर २०२१ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने सनातनच्या युवा साधकांसाठी आयोजित करण्यात आलेले युवा शिबिर भावपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराला दक्षिण कन्नड जिल्ह्यातील १३ युवा साधक उपस्थित होते. सनातनच्या साधिका सौ. संगीता प्रभु यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला, तर सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिचय, तसेच सनातन संस्था करत असलेल्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याची माहिती सौ. पवित्रा कुडवा यांनी दिली.
‘कोरोना महामारीच्या वेळी पालन करायचे नियम आणि आध्यात्मिक उपाय’ याविषयी कु. पुष्पा मेस्त यांनी मार्गदर्शन केले.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्र मोगेर यांनी युवा शिबिरार्थींना हिंदु जनजागृती समितीचा उद्देश आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने समिती करत असलेले विविध उपक्रम, धर्मशिक्षण वर्ग, राष्ट्र आणि धर्म जागृती करणार्या फलकांचे प्रदर्शन, सामाजिक माध्यमांद्वारे होणारा प्रसार इत्यादींविषयी माहिती दिली. जनप्रबोधनासाठी घेण्यात येणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभा, विविध आंदोलने आणि त्यातून मिळालेले यश ऐकून शिबिरार्थी प्रभावित झाले. ‘हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा’, असे आवाहन श्री. चंद्र मोगेर यांनी केले.
शिबिरार्थींनी व्यक्त केलेले अभिप्राय
१. ‘या वर्षी मी युवा साधक शिबिराला येतांना माझ्या कुटुंबियांच्या मनात ‘मी चांगल्या कार्यासाठी जात आहे’, असा विचार असल्याने त्यांनी शिबिराला जाण्यासाठी अनुमती दिली. हे केवळ गुरुकृपेनेच साध्य झाले. या शिबिरात ‘नामजप योग्य रितीने कसा करावा ?’, ‘नामजपादी उपाय करावे ?’ आदी शिकायला मिळाले.’ – कु. मानसा प्रभु, उजिरे. (वय १८ वर्षे)
२. ‘या आपत्काळातही शिबिराला उपस्थित रहाण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञता वाटली. शिबिरामुळे आध्यात्मिक साधना कशी करायची, याविषयी शिकायला मिळाले; तसेच साधना आणि सेवा करण्यासाठी अधिक उत्साह मिळाला.’ – कु. दीक्षा वळचिल, मंगळुरू (वय १७ वर्षे)
३. ‘व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन मिळाले. सेवा करण्यासाठी उत्साह वाढला.’ – कु. सौम्या, पुत्तुरू (वय २२ वर्षे)