नागपूर येथे ‘यु.सी.एन्. केबल नेटवर्क’वरील चर्चासत्रात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने दीपावलीच्या धर्मशास्त्राविषयी प्रबोधन

नागपूर, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील ‘यु.सी.एन्. केबल नेटवर्क’द्वारे दिवाळीनिमित्त १ नोव्हेंबर या दिवशी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सनातन संस्थेच्या अधिवक्त्या सौ. वैशाली परांजपे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विद्याधर जोशी सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन ‘यु.सी.एन्. केबल’च्या सौ. संपदा पंडीत यांनी केले.

अधिवक्त्या सौ. परांजपे यांनी दीपावलीमध्ये येणार्‍या वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन या सणांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व आणि ‘सण कसा साजरा करावा ?’ याविषयी माहिती दिली, तसेच ‘प्रत्येक दिवशी करावयाच्या कृतींमागील शास्त्र समजून सण साजरा केला, तर त्याचा खरा लाभ होतो’, असे सांगितले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. विद्याधर जोशी म्हणाले, ‘‘दिवाळी हा हिंदूंचा मोठा सण आहे. त्यानिमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल असते; मात्र व्यावसायिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देवतांचे विडंबन होतांना दिसून येते. त्याला वैध मार्गाने विरोध करणे, ही सुद्धा देवतेची उपासनाच आहे. आपल्या सणांचे पावित्र्य राखणे, हे आपले कर्तव्य असून, तसे करणे ही काळानुसार समष्टी साधना आहे. दिवाळी जुगार खेळणे, अभक्ष्य भक्षण करणे हे निषिद्ध असून, तसे करणे धर्मशास्त्र संमत नाही. दुष्परिणामांचा विचार करता फटाके फोडणे, हे सुद्धा अयोग्य आहे.’’

या चर्चासत्राचे प्रसारण ४ नोव्हेंबर या दिवशी सकाळी आणि सायंकाळी असे २ वेळा करण्यात आले. ‘यु.सी.एन्. केबल’च्या माध्यमातून विदर्भ आणि मध्य भारत येथील १० लक्ष लोकांपर्यंत दिवाळीची अध्यात्मशास्त्रीय माहिती पोचली.