इयत्ता ८ वीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही ! डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – कोरोना महामारीची तीव्रता अल्प झाल्याने इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यात आलेले असले, तरी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्ग चालू करण्यासंबंधी शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘इयत्ता ८ वीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी कृती समितीची लवकरच बैठक होणार आहे आणि या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.’’
इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत प्रत्यक्ष वर्ग सर्वच ठिकाणी चालू झालेले नाही
शिक्षण खात्याने इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यास अनुमती दिलेली असली, तरी त्याची सर्वच ठिकाणी कार्यवाही झालेली नाही. शहरातील विद्यालयांमध्ये साधन-सुविधांंच्या अभावामुळे वर्गात सामाजिक अंतर पाळणे, या नियमाची पूर्तता करणे कठीण आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या नुकत्याच वर्गात परीक्षा घेण्यात आल्या आणि या परीक्षा संपल्यानंतर दिवाळीची सुटी पडली. या कारणांमुळे सर्वच ठिकाणी प्रत्यक्ष वर्ग चालू झालेले नाहीत. दिवाळीची सुटी संपल्यानंतर म्हणजे १७ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग नियमितपणे चालू होण्याची शक्यता आहे.