देशात होणारी गोहत्या रोखायला हवी ! – सर्व गोसंवर्धकांचा निर्धार
पुणे येथे दोन दिवसीय ‘राष्ट्रीय गोसंवर्धन परिषद’ पार पडली
गोमातेचा देश असणाऱ्या भारतात देशी गाय शोधावी लागणे दुर्दैवी ! – संपादक
पुणे, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – आपल्या देशातील शेवटच्या टोकापर्यंत रहाणार्या नागरिकांना गायीचे महत्त्व ठाऊक असायला हवे. यासाठी देशात होणारी गोहत्या रोखायला हवी. गोहत्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोसंवर्धन करण्याची आवश्यकता आहे. हेच ध्येय ठेवून गोसंवर्धन करण्याचा निर्धार सर्व गोसंवर्धकांनी केला. ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दिवशी येथील नेहरू सभागृहात ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह’ संचालित आणि गोसंवर्धन महासंघ आयोजित ‘राष्ट्रीय गोसंवर्धन परिषद’ पार पडली. या परिषदेतील उद्घाटनसत्रात ते बोलत होते. या परिषदेला ‘कोहिनूर ग्रुप’चे श्री. कृष्णकुमार गोयल, धारिवाल फाऊंडेशनच्या शोभा धारिवाल, विश्व हिंदु परिषदेचे श्री. दादा वेदक, श्री. भाऊराव कुदळे, उद्योजक श्री. प्रदीप चोरडिया, श्री. महेंद्र देवी, श्री. शेखर मुंदडा, श्री. राजेंद्र लुंकड, श्री. संजय मुर्दाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या दोन दिवसीय परिषदेमध्ये गोउत्पादने, नाडी परीक्षण, पंचगव्य चिकित्सा यांची प्रदर्शनेही लावण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शोभा धारिवाल म्हणाल्या, ‘‘पंचगव्य उपचारांचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे देशी गायीशी संबंधित उपचारांचा वापर करण्याची प्रवृत्ती वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशातील या संपत्तीचा प्रचार जगभर व्हायला हवा.’’
प्रास्ताविकात रमेश अग्रवाल म्हणाले, ‘‘प्रकृती केंद्रित समाज विकासासाठी राष्ट्रीय गोसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समुहाच्या माध्यमातून राज्यातील १०० पेक्षा अधिक गोपालक संस्थांचा समूह गोसंवर्धन महासंघ म्हणून राज्यात कार्य करत आहे. गोसंवर्धन आधारित रोजगारनिर्मिती, कृषीव्यवस्था, तसेच चिकित्सा व्यवस्था यांविषयी प्रचार व्हावा, तसेच गो विज्ञानाविषयी सर्वांना मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.’’ कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात गोपूजन करण्यात आले.
विदेशी नव्हे, तर देशी बी-बियाणांचे अधिकोष निर्माण व्हायला हवेत ! – पद्मश्री राहीबाई पोपरे
शेण, गोमूत्र आणि त्यांच्याशी निगडित उत्पादनांचा वापर, ही आपली संस्कृती आहे. सध्या ही संस्कृती हरवत चालली आहे. प्रत्येक शेतकर्याच्या दारात किमान १-२ देशी गायी असायला हव्यात. विदेशी नव्हे, तर देशी बी-बियाणांचे अधिकोष निर्माण व्हायला हवेत. सर्वांनी पारंपरिक आणि नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यायला हवे. काळ्या मातीचे आरोग्य सांभाळणे, हे आपलेच दायित्व आहे. यासाठी शेतकर्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरते.
गाय गोशाळेपेक्षा शेतकर्यांकडे अधिक चांगली राहील ! – भाऊराव कुदळे, विश्व हिंदु परिषद
देशात २ सहस्र संस्था गोरक्षणाचे कार्य करतात. सध्या गायींवर २०० जण विद्यावाचस्पती पदवीचा अभ्यास करत आहेत. गायीच्या नखाविषयीही अभ्यास करण्याची अनुमती विद्यापिठांतून देण्यात आली आहे. हेच खरे वैभव आहे. देशात गोदानाची परंपराही वाढली आहे. एकट्या गोवा राज्यात रस्त्यावर फिरणारी १९ सहस्र जनावरे आहेत, त्यांपैकी ४ सहस्र ५०० श्वेत कपिला गायी आहेत. गाय ही गोशाळेपेक्षा शेतकर्यांकडे अधिक चांगली राहील. ही स्थिती निर्माण होण्यासाठी आपण सर्वांनी गोसंवर्धन करायला हवे.
देशी गायीच्या गोशाळांना प्राधान्य द्यायला हवे ! – शेखर मुंदडा, संस्थापक, महा एन्.जी.ओ.
गायीच्या सर्व महत्त्वपूर्ण माहितीविषयी जनजागृती व्हायला हवी. पूर्वी गायीचे महत्त्व इतक होते की, लग्नासाठी स्थळ पहायचे असेल, तर वरपक्षाकडे किती गायी आहेत, यावरून त्यांची श्रीमंती ठरत असे. सध्या हिंदु धर्मातील कोणते विधी करायचे झाल्यास देशी गाय शोधावी लागते, हे दुर्दैव आहे. आपल्याकडे देशी गायीच्या गोशाळांना प्राधान्य द्यायला हवे. या गोशाळा शहरातील उद्याने आदी ठिकाणांना जोडून असल्यास आणखी चांगले होईल.
देशी गायीचे महत्त्व आज विज्ञानाद्वारे दाखवावे लागत आहे, हे दुर्दैव ! – डॉ. स्वानंद पंडित
आज आपल्याच देशातील देशी गायीचे महत्त्व लोकांना विज्ञानाद्वारे समजवावे लागत आहे, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. गायीला धर्म आणि विज्ञान यांच्याशी जोडायला हवे. गायीवर संशोधन होणे, ही काळाची आवश्यकता आहे.
देशाला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केल्यास गोमाता सुरक्षित राहील ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा १२८ प्रकारचे गोवंश होते, आज केवळ २८ प्रकारचे गोवंश शिल्लक आहेत. आज देशात ३३ सहस्र ६०० अधिकृत आणि अनधिकृत पशूवधगृहे आहेत. यातून होणार्या गोहत्या रोखण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून कायदेशीर लढा चालू आहे. मागील १० वर्षांत ५२ अनधिकृत पशूवधगृहे उघडकीस आली असून त्यांतील अनेक पशूवधगृहे बंद पाडली गेली. त्यामुळे गोहत्या थांबवण्यासाठी गोसंवर्धन आवश्यक आहे. मिठाईवरील वर्ख, चामड्याच्या वस्तू इ. गायीच्या हत्या करून ज्या वस्तू बनवल्या जातात, त्यावर आपण बहिष्कार टाकला पाहिजे. गायींचे संवर्धन करण्यासाठी आणि गायीला गोमाता म्हणून घोषित करण्यासाठी सर्वांनी मिळून आंदोलन उभे करायला हवे ! त्याचसमवेत राज्य आणि केंद्र सरकारने गोसंवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत. देशाला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केल्यास गोमाता सुरक्षित राहील.
कार्यक्रमाच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीनेही सनातनची सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला पद्मश्री सौ. राहीबाई पोपरे, उद्योजक श्री. प्रदीप चोरडिया, श्री. महेंद्र देवी, श्री. अतुल सराफ, श्री. राजेंद्र लुंकड, विश्व हिंदु परिषदेचे श्री. दादा वेदक आणि श्री. भाऊराव कुदळे, माजी खासदार श्री. अनिल शिरोळे, श्री. स्वानंद पंडित यांसह अन्य मान्यवरांनी भेट देऊन समिती, तसेच संस्था यांच्या कार्याचे कौतुक केले.
श्री. महेंद्र देवी आणि श्री. विजय वरुडकर यांचे ग्रंथप्रदर्शनासाठी पुष्कळ सहकार्य लाभले. याविषयी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. |