सारस्वत धर्म जागवणारी साहित्य संमेलने आवश्यक !
संपादकीय
साहित्य संमेलनातून हिंदु धर्माच्या अवमानाविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक !
राज्यातील साहित्यिक, लेखक आणि मराठी भाषिक ज्यांची वर्षभर आतुरतेने वाट पहातात, ते ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर ३ ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत नाशिक येथे होत आहे. राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे या अगोदर २६ ते २८ मार्च या कालावधीत होणारे संमेलन स्थगित करण्यात आले होते. तेव्हापासून हे संमेलन अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले होते; मात्र दुसर्या लाटेनंतर कोरोनाचा संसर्ग अल्प होत असल्याने ते परत एकदा नाशिक येथेच घेण्याचे ठरले. खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. पूर्वीच्या काळी मराठी भाषिकांना निखळ आनंद देणारी, त्यांच्या ज्ञानात भर टाकणारी, अभ्यासपूर्ण परिसंवाद असणारे, मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी असलेल्या संमेलनांचे स्वरूप पालटून ती हौशे-गौशे यांचा मनोरंजन करण्याचा राज्यस्तरीय वार्षिक कार्यक्रम झाला आहे, अशी स्थिती आहे. संमेलन हे अधिकाधिक भव्य-दिव्य, झगमगीत करण्याकडेच ओढा वाढल्याने प्रत्येक वर्षी राजकारण्यांची संमेलनावरची छाया अधिक गडद होत आहे. हे चित्र पालटण्यासाठी आता महामंडळाचे सदस्य, साहित्यिक यांनी इच्छाशक्ती दाखवून कृतीशील पुढाकार घ्यावा, हीच मराठीजनांची इच्छा आहे !
मराठीला न्याय देणारा अध्यक्ष असावा !
पूर्वीच्या काळी महादेव गोविंद रानडे, कृष्णशास्त्री रानडे, नृसिंह चिंतामण केळकर, प्र.के. अत्रे, वि.वा. शिरवाडकर, पु.भा. भावे, राम शेवाळकर, द.मा. मिरासदार यांसारख्या अनेक दिग्गजांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. या केवळ व्यक्ती नव्हत्या, तर त्यांच्यामुळे अध्यक्षपदाची उंचीही वाढली. साधारणत: वर्ष २००० पर्यंत निवडण्यात येणारे अध्यक्ष हे खरोखरच ज्यांचे मराठीसाठी योगदान आहे, ज्यांना साहित्याची जाण आहे, असे असणारे होते. पूर्वीचे संमेलनाध्यक्षांचे स्वागत भाषण हे ऐकण्यासारखे असायचे. ते काही चुकीचे वाटल्यास जाहीररित्या संयोजकांचे कान पकडण्यासही मागे-पुढे पहात नसत; मात्र वर्ष २००० नंतरचे चित्र बिघडलेलेच पहायला मिळाले.
काही हिंदुविरोधी, तसेच धर्म-अध्यात्म यांच्या विरोधी विचारसरणी असलेले संमेलनाध्यक्ष लाभले की, ज्यातून संमेलनाला काय मिळाले ?, हे मोठे प्रश्नचिन्हच आहे. अशा अध्यक्षांमुळे संमेलनाला काही लाभ तर झालाच नाही, उलट संमेलनच वादाच्या गर्तेत सापडले. संमेलनाध्यक्षपदासाठी ‘मराठी भाषा-संस्कृती’ हा केंद्रबिंदू न रहाता कुणालाही हे अध्यक्षपद देण्यात येऊ लागले.
मराठी माणूस आणि मराठी भाषा हा केंद्रबिंदू हवा !
स्वातंत्र्यपूर्वकाळात होणार्या अगदी ७०-८० च्या दशकापर्यंत होऊन गेलेल्या संमेलनात मराठी माणूस आणि मराठी भाषा हा केंद्रबिंदू होता. तो नंतर भरकटत गेला. मराठी भाषेवर होणारी आक्रमणे, त्यावर उपाय यांवर केवळ वरवरची आणि दिखाऊ चर्चा होते. वर्ष २००० नंतर इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे पहिलीपासून मराठी विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहेत. यावर नेमकी काय उपाययोजना करावी ?, शासन दरबारी दबाव कसा वाढवावा ?, यावर कोणताही प्रयत्न या संमेलनांमधून होतांना दिसत नाही. संमेलनात ठराव करणे आणि ते शासनाकडे पाठवणे, या पलीकडे काहीच होत नाही. त्यामुळे आता मराठी माणूस आणि मराठी भाषा केंद्रबिंदू ठेवून संमेलने घ्यावी लागतील.
कोरोना संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणातून आभासी शिक्षणाकडे वळावे लागले. यामुळे हळूहळू कोवळ्या वयातच पुस्तकांच्या सहवासापेक्षा मुलांच्या हातात भ्रमणभाष आले. अशा वेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांची गोडी लागेल, यासाठी सारस्वतांकडून विशेष प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. वास्तविक वाचन संस्कृती वाढवण्याचे दायित्व साहित्यिक आणि लेखक यांच्यावर नाही का ? अशा गोष्टींवरही संमेलनात ऊहापोह होणे अत्यावश्यक आहे.
दिशादर्शक कार्यक्रम ठेवावे लागेल !
नवीन लेखकांनी सध्या कोणते लिखाण करावे ? भाषाभिमान वाढवण्यासाठी काय करावे ? मराठी शाळांची संख्या कशी वाढेल ? भाषेमधील परकीय शब्द नाहिसे करण्यासाठी काय करावे ? भाषेच्या उत्कर्षासाठी काय करावे ? लेखक-वाचक यांची नाळ जोडण्यासाठी काय करावे ? चांगले वयोवृद्ध लेखक, साहित्यिक यांना आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी काय प्रयत्न करावेत ? यांवर कार्यक्रम आणि चर्चासत्रे ठेवावे लागतील. पुढील वर्षीपर्यंत काय कार्यक्रम करायचे ?, याचा ठोस कृती आराखडा करून त्याची कार्यवाही करावी लागेल.
साहित्यिकांनी सारस्वत धर्म जागवण्याची आवश्यकता !
इंग्रजीच्या अवास्तव आणि अनावश्यक प्रभावामुळे प्रत्येक क्षेत्रात मराठी माणूस चेपला जात आहे. कुणीही उठतो आणि मराठी माणूस, भाषा, हिंदु धर्म यांवर काहीही बोलतो; मात्र आवाज उठवण्याचे धाडस संमेलनात होतांना दिसत नाही. लेखणीत समाज पालटण्याची शक्ती असते. सध्या सामाजिक माध्यमांचे युग आहे. हिंदु धर्म, संस्कृती यांवर टीका झाल्यास सामाजिक माध्यमांमध्ये लोक त्यांच्या परीने आवाज उठवण्याचा, त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतात. या विरोधाचे नेतृत्व करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या विरोधाला दिशा मिळेल, त्याला वैचारिक बैठक असेल. त्यासाठी साहित्यिकांनाच आता पुढाकार घ्यावा लागेल. ते हा विषय लक्षात घेऊन पुढाकार घेतील, ही अपेक्षा !