उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. श्वेत प्रवीण बंगाळ (वय ३ वर्षे) !
(‘वर्ष २०२० मध्ये चि. श्वेत याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)
कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया (६.११.२०२१) या दिवशी चि. श्वेत प्रवीण बंगाळ याचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे अन् त्याच्या मावशीला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. श्वेत प्रवीण बंगाळ याला तिसर्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. गर्भारपण
१ अ. वेदपाठशाळेतील संस्कृत श्लोक, वेद आणि मंत्र यांच्या पठणाचा गर्भावर संस्कार होणे : ‘गर्भारपणी २ मास मी कवळे मठ (फोंडा) येथील वेदपाठशाळेतील मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय शिकवण्यासाठी जात असे. तेथे इतर मुले संहितावाचन, तसेच संस्कृत श्लोक, वेद आणि मंत्र यांचे पठण आदी करत असतांना मला ते सर्व ऐकू येत असे. त्यामुळे नकळत बाळावर त्याचा संस्कार झाला.
१ आ. आनंद आणि उत्साह जाणवणे : गर्भधारणा झाल्यानंतर मला पुष्कळ आनंद आणि उत्साह जाणवत होता. त्या दिवसांत आलेले सर्व सण-उत्सव आणि सेवा माझ्याकडून अगदी आनंदाने अन् मनापासून केली जात होती.
१ इ. सनातनच्या संतांचा सत्संग लाभणे
१ इ १. सद्गुरु सत्यवान कदम यांची ६ – ७ वर्षांनी भेट होणे : मला दुसरा मास चालू असतांना आमच्या केंद्रात सद्गुरु सत्यवानदादा (सद्गुरु सत्यवान कदम) आले होते. त्या वेळी ६ – ७ वर्षांनी माझी त्यांच्याशी भेट झाली. ‘एवढ्या वर्षांनी ते भेटणार’, या विचारानेच माझा आनंद द्विगुणित झाला.
१ इ २. त्या काळात माहेरी नंदुरबारला हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. त्यामुळे तेथे सद्गुरु नंदकुमार जाधवकाका येत होते आणि माझी त्यांच्याशी भेट होत होती.
१ ई. गुरुचरित्राचे पारायण, तसेच कुलदेवीचा नामजप आणि प्रार्थना करणे : मी गुरुचरित्राचे पारायण केले. पारायण चालू करण्यापूर्वी संकल्प करतांना माझ्याकडून ‘या पारायणामुळे गर्भावर चांगला संस्कार होऊ दे. बाळावर तुमची कृपा होऊ दे’, अशी प्रार्थना झाली. पारायण चालू झाल्यावर माझा आनंद वाढू लागला. सर्व ७ पारायणे निर्विघ्नपणे पार पडली. १ पारायण करायला ७ दिवस लागतात. त्याप्रमाणे ७ पारायणे करायला ४९ दिवस लागले. त्या दिवसांत मी अधिक वेळ बसूनही मला त्रास झाला नाही. मी प्रतिदिन कुलदेवीचा आणि दत्तगुरूंचा नामजप, तसेच कुलदेवीला प्रार्थना करत होते, ‘हे देवी, साधना करण्यासाठी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी योग्य अशा बाळाची मला प्राप्ती होऊ दे.’ मी आठव्या मासात माहेरी गेले. तेव्हा भाद्रपद मास होता. त्या काळात मी रामरक्षा आणि हरिपाठ म्हणत होते. नंतर नवरात्रीत मी ‘दुर्गासप्तशती’चे पाठ केले. हे सर्व करण्यास जणू देवच मला शक्ती देत होता.
‘संपूर्ण गर्भारपणाच्या काळात माझ्याकडून हे प्रयत्न झाले आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी ते करवून घेतले’, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते १ मास
१. श्वेत जन्मापासूनच शांत आहे. ‘रात्री पुष्कळ जागरण किंवा रडणे’, असे त्याने कधीच केले नाही.
२. श्वेत १ मासाचा असतांना कु. रागेश्री देशपांडे ही साधिका आमच्या घरी आली होती. ती माझ्या खोलीत येऊन नामजप करत बसली. नामजप झाल्यावर ती म्हणाली, ‘‘बाळाकडे बघून पुष्कळ शांत वाटते आणि माझा नामजपही चांगला झाला.’’
२ आ. १ मास ते १ वर्ष
१. श्वेतला बघितल्यावर पुष्कळ प्रसन्न वाटते. तो पुष्कळ शांत आणि आनंदी आहे.
२. गोकुळाष्टमीच्या दिवशी आठ मासांच्या श्वेतला कृष्णाची वेशभूषा केली होती. त्या वेळी त्याला बघून ‘तो खरोखर बाळकृष्णच आहे’, असे वाटत होते. बर्याच साधकांनी त्याची छायाचित्रे बघितल्यावर तसेच सांगितले.
३. श्वेतला श्रीकृष्णाचे चित्र आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवल्यावर पुष्कळ आनंद होतो. तो काहीतरी पुटपुटतो आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. २.९.२०१९ या दिवशी मी ढवळी (फोंडा) येथे गेले होते. तेथे असलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र बघून श्वेतला पुष्कळ आनंद झाला आणि त्याने त्यांच्याकडे झेप घेतली. जणूकाही त्याला परात्पर गुरुदेवांना भेटायचे होते. श्वेत १ वर्षाचा असतांना मी त्याला घेऊन रामनाथी आश्रमात गेले होते. त्या वेळी स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या प्रतिमेकडे पाहून त्याला पुष्कळ आनंद झाला. तो बराच वेळ त्या चित्राकडे पाहून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता.
‘देवाच्या कृपेने वरील सूत्रे माझ्या लक्षात आली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादामुळे मी गर्भारपणात साधनेचे प्रयत्न करू शकले’, त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. कल्याणी बंगाळ (आई), फोंडा, गोवा. (वर्ष २०१९)
४. ‘नंदुरबारला आमचे एकत्र कुटुंब आहे. जेव्हा श्वेतचा जन्म झाला, तेव्हा त्या खोलीत पुष्कळ गोंधळ आणि दंगा असायचा; पण श्वेतवर त्याचा काही परिणाम होत नसे. तो शांत झोपलेला असायचा. त्याच्या हाताच्या बोटांची मुद्रा केलेली असायची. त्या वेळी ‘तो देवाशी एकरूप होऊन नामजप करत आहे’, असे वाटायचे.
५. श्वेत ८ – ९ मासांचा असतांना गणेशचतुर्थी होती. त्या दिवसांत तो आरती चालू असतांना टाळ्या वाजवून त्याच्या भाषेत बोलत असे. ‘तो आरती म्हणत आहे’, असे वाटत असे.
६. जेवतांना दूरचित्रवाणी किंवा भ्रमणभाष पहाण्यापेक्षा देवघराजवळ बसून जेवण करायला श्वेतला अधिक आवडते.
७. त्याला मारुतिस्तोत्र ऐकायला आवडते. तो ते आनंदाने ऐकतो.’
– कु. भावना कदम (मावशी), नंदुरबार (वर्ष २०१९)
३. चि. श्वेतमधील स्वभावदोष
‘भित्रेपणा’ – सौ. कल्याणी बंगाळ
श्वेतकडून घडो समष्टी पावलोपावली ।
रूप तुझे कान्हासम भासे ।
गुरुदेवांची छत्रछाया असे ।। १ ।।
साधकत्व तुझ्यात रुजे ।
धर्मरक्षणासाठी तू घडतसे ।। २ ।।
व्यष्टी साधना जडो तव मनी ।
समष्टी साधना घडो पावलोपावली ।। ३ ।।
श्वेत हिंदु राष्ट्राची पताका सदैव झळकवो ।
हीच प्रार्थना गुरुमाऊली तुमच्या चरणी ।। ४ ।।
– कु. भावना कदम (चि. श्वेतची मावशी), नंदुरबार (वर्ष २०१९)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |