मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा !
श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या जयघोषाने मालवण शहर दुमदुमले !
मालवण – मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा ५ नोव्हेंबरला मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. एरवी देवाच्या दर्शनासाठी भक्तांना मंदिरात जावे लागते; मात्र दिवाळी पाडव्याच्या दिवशी श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण प्रत्यक्ष भेटीला आल्याने ‘याची देही, याची डोळा, प्रत्यक्ष देव मी पाहिला’ या अनुभूतीने समस्त मालवणवासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
५ नोव्हेंबर या दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुपारी श्री देव रामेश्वर मंदिराकडून सवाद्य पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर पालखी प्रथम श्री देव नारायणाच्या भेटीला गेली. तेथून श्री पावणाईदेवी, श्री भावईदेवी, श्री सातेरीदेवी, वायरी-भूतनाथ येथील श्री देव भतूनाथ, दांडी समुद्रकिनारी शिवकालीन ‘मोरयाचा धोंडा’ (छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमीपूजन केले ते स्थळ), श्री दांडेकर यांची भेट घेऊन पालखी श्री काळबाईदेवी मंदिरात आली. श्री काळबाईदेवी श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांची बहीण असल्याने तेथे पारपंरिक पद्धतीने भाऊबिजेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यानंतर पालखी बंदर जेटीमार्गे सोमवारपेठ येथील श्री रामेश्वर मांडावर आली. भाविकांना देवतांचे दर्शन घेता यावे, यासाठी या ठिकाणी पालखी ठेवण्यात आली. तेथून पालखी बाजारपठेमार्गे भरड नाक्यावर आल्यावर तेथे पालखीचे स्वागत करण्यात आले. रात्री विलंबाने ही पालखी श्री देव रामेश्वर मंदिरात आल्यावर सोहळ्याची सांगता झाली.
वरूणराजाच्या आगमनानंतरही सहस्रो भाविकांनी घेतले श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचे दर्शनवर्षभराने देव भेटीला येणार असल्याने देवाच्या दर्शनासाठी भक्त आतुरतेने वाट पहात होते. त्यातच यावर्षी पालखी सोहळा चालू झाल्यावर वरूणराजाचेही आगमन झाले. तरीही देवाचे दर्शन घेऊन त्याचे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भरपावसातही सहस्रो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. साहेळ्यानिमित्त मालवण शहर विद्यतु रोषणाईने उजळून निघाले होते, तर ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या जयघोषामुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते. |