श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती कॅनडा येथून भारतात परत आणण्यात यश !
|
नवी देहली – वर्ष १९१३ मध्ये, म्हणजे १०८ वर्षांपूर्वी तस्करीच्या माध्यमातून चोरून भारताबाहेर नेण्यात आलेली श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती भारतात परत आणण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे ही मूर्ती परत आणण्यात यश मिळाले आहे. ही मूर्ती कॅनडातील रेजिना विश्वविद्यालयाच्या मेकेंजी कला संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली होती.
१. नोव्हेंबर २०२० मध्ये रेडिओवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती भारतात परत आणण्याची घोषणा केली होती.
२. सांस्कृतिक मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय यांच्या साहाय्याने विदेशातील पुरातन भारतीय वस्तू परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे भारताला वर्ष १९७६ पासून ५५ मूर्ती परत मिळाल्या होत्या. त्यातील ४२ मूर्ती वर्ष २०१४ नंतर, म्हणजे मोदी सरकारच्या कार्यकाळात मिळाल्या आहेत. (यातून काँग्रेसने ६५ वर्षांच्या सत्ताकाळात या मूर्ती मिळवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे आणि तिची हिंदु धर्माविषयी असलेली उदासीनता दिसून येते. अशा काँग्रेसवाल्यांवर देवतांनी तरी कृपा का करावी ? – संपादक)
३. सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती १५ नोव्हेंबर या दिवशी वाराणसी येथे पोचणार आहे. तेथे धार्मिक अनुष्ठान केल्यानंतर वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.