कार्तिक मासातील (७.११.२०२१ ते १३.११.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
‘५.११.२०२१ दिवसापासून कार्तिक मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, शरदऋतू, कार्तिक मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
२. शास्त्रार्थ
२ अ. भद्रा (विष्टी करण) : भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. ७.११.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.४७ पासून ८.११.२०२१ या दिवशी दुपारी १.१७ पर्यंत आणि ११.११.२०२१ या दिवशी सकाळी ६.५० पासून सायंकाळी ६.१६ पर्यंत विष्टी करण आहे.
२ आ. विनायक चतुर्थी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ‘विनायक चतुर्थी’ म्हणतात. या दिवशी श्री विनायक (गणेश) व्रत करतात. या दिवशी श्री विनायकी चतुर्थी माहात्म्य, व्रतकथा आणि श्री विनायक अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात. ८.११.२०२१ या दिवशी विनायक चतुर्थी आहे.
२ इ. पांडव पंचमी आणि कड पंचमी : पांडव पंचमी म्हणजे पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार कौरवांवर विजय मिळवला, तो दिवस. पांडवांसारखे आदर्श गुण ग्रहण करण्यासाठी कार्तिक शुक्ल पक्ष पंचमीला ‘पांडव पंचमी’ साजरी करतात. सूर्याेदयकाली असलेल्या कार्तिक शुक्ल पक्ष पंचमीला पांडव पंचमी साजरी करतात. कार्तिक शुक्ल पक्ष पंचमीला ‘कड पंचमी’ किंवा ‘सौभाग्य पंचमी’ म्हणतात. या दिवशी आनंदप्राप्ती आणि इच्छापूर्तता यांसाठी श्री गणेश अन् भगवान शंकर यांची पूजा करतात. ९.११.२०२१ या दिवशी पांडव पंचमी आणि कड पंचमी आहे.
२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ९.११.२०२१ या दिवशी दुपारी ४.५९ पासून १०.११.२०२१ या दिवशी सकाळी ८.२६ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ उ. दग्धयोग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्धयोग होतो. दग्धयोग हा अशुभयोग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. ९.११.२०२१ या दिवशी मंगळवार असून सकाळी १०.३६ पर्यंत पंचमी तिथी असल्याने ‘दग्धयोग’ आहे.
२ ऊ. कल्पादि : कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी तिथीला ‘कल्पादियोग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे. १०.११.२०२१ या दिवशी सकाळी ८.२६ नंतर सप्तमी तिथी आहे.
२ ए. गोपाष्टमी : कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘गोपाष्टमी’ साजरी करतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णासह गायीचे पूजन करून तिला प्रदक्षिणा घालतात. भगवान श्रीकृष्णाने याच तिथीला गायींना चरायला नेण्यास आरंभ केला. गोमातेच्या सेवेने सर्व देवता प्रसन्न होतात. या दिवशी गायीच्या मागून चालतात. ११.११.२०२१ या दिवशी गोपाष्टमी आहे.
२ ऐ. कूष्मांड नवमी : कार्तिक शुक्ल पक्षातील नवमी तिथीला ‘कूष्मांड नवमी’, ‘अक्षय नवमी’, ‘धात्री (आवळा) नवमी’ किंवा ‘आरोग्य नवमी’, असेही म्हणतात. १२.११.२०२१ या दिवशी कूष्मांड नवमी आहे. कार्तिक शुक्ल पक्षातील नवमी तिथीला ‘धात्री (आवळा) नवमी’ किंवा ‘आरोग्य नवमी’ म्हणतात; कारण आयुर्वेदात आरोग्यासाठी लाभदायक असणार्या आवळा या फळाला आरोग्यवर्धक मानले आहे. आवळा खाल्ल्याने शरीर शुद्ध (Detox) होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास साहाय्य होते.
या दिवशी भगवान विष्णु आणि श्री कूष्मांडादेवी यांची आवळीच्या झाडाखाली पूजा केल्याने सर्व रोग, शोक अन् भय यांपासून मुक्ती मिळते. कूष्मांड म्हणजे कोहळा. या दिवशी आवळीच्या झाडाच्या मुळाजवळ श्रीविष्णूचे पूजन करतात. आवळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. नंतर
कूष्माण्डं बहुबीजाढ्यं ब्रह्मणा निर्मितं पुरा ।
दास्यामि विष्णवे तुभ्यं पितृणां तारणाय च ।। – व्रतशिरोमणि
अर्थ : हे विष्णु, प्राचीन काळी ब्रह्मदेवाने निर्माण केलेला, अनेक बिजांनी (बियांनी) युक्त असा हा कोहळा मी पितरांच्या उद्धारासाठी तुला दान करत आहे.
अशी प्रार्थना करून कोहळा गायीच्या तुपात बुडवून ब्राह्मणाला दान करतात.
२ ओ. युगादि : कार्तिक शुक्ल पक्ष नवमी तिथीला ‘युगादियोग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे. १२.११.२०२१ या दिवशी उत्तररात्री ५.३२ पर्यंत कार्तिक शुक्ल नवमी तिथी आहे.
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.
टीप २ – भद्रा (विष्टी करण), विनायक चतुर्थी, घबाड मुहूर्त आणि दग्धयोग यांविषयीची अधिक माहिती यापूर्वीच्या लेखांतून प्रसिद्ध केली आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित आणि हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.१०.२०२१)