निवडणूक आचारसंहितेपूर्वी राज्यात रथयात्रा काढणार ! – सुदिन ढवळीकर, आमदार, मगोप
भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा निर्णय १५ डिसेंबरनंतर
पणजी – गोवा विधानसभेची मार्च २०२२ पूर्वी निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी मगोपनेही जोरदार सिद्धता चालू केली आहे. मगोपने १२ मतदारसंघांत उमेदवार घोषित केले असून आणखी ६ मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा मगोपचा मानस आहे. सध्या भाजपला मगोपशी युती हवी आहे; मात्र मगो पक्षाने कडक धोरण अवलंबले आहे. पक्षाचे नेते श्री. सुदिन ढवळीकर यांनी भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा निर्णय १५ डिसेंबरनंतर कधीही होऊ शकतो, असे निवेदन केले आहे. त्याचसमवेत डिसेंबरमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होण्याअगोदर संपूर्ण गोव्यात पक्षाच्या वतीने रथयात्रा काढली जाईल, असे घोषित केले आहे.
३ दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी ‘भाजप-मगोप युतीसंदर्भात श्री. सुदिन ढवळीकर यांच्याशी चर्चा करणार’, असे सांगितले होते. या संदर्भात मगोपचे नेते श्री. सुदिन ढवळीकर यांनी भाजपसमवेत युती आता शक्य नाही. मगो पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ‘भाजपसमवेत युती करायची नाही’, असा ठाम निर्णय घेतलेला आहे.
मगो पक्षामध्ये भाजपने विश्वासघात केल्याची भावना !
वर्ष १९९९ मध्ये तत्कालीन केंद्रीय नेते प्रमोद महाजन यांनी रात्री १ वाजता ‘भाजपने मगोशी युती तोडलेली आहे’, असे घोषित केले होते. तेव्हा युती भाजपने तोडली. वर्ष २००२ मध्ये भाजपने मगोशी संबंध तोडल्यानंतरही मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी मगोपने भाजपला पाठिंबा दिला. वर्ष २००७ मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर यावे, यासाठी मगोपने काँग्रेस सरकारमधून बाहेर पडून फार मोठी जोखीम पत्करली. आम्हाला काँग्रेसच्या नेत्यांनी अपात्र ठरवले, तर भाजपच्या नेत्यांनी आमच्या पाठीशी न रहाता आमचा विश्वासघात केला. वर्ष २०१२ मध्ये मगोपने भाजपशी युती केली. सरकार सत्तेवर आले. त्यानंतर मनोहर पर्रीकर देशाचे संरक्षणमंत्री म्हणून देहलीत गेल्यानंतर भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मगोपच्या दोन्ही मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकले. वर्ष २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे सरकार कोसळले. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या सांगण्यावरून भाजपला साहाय्य केले. भाजपचे सरकार सत्तेवर आले; पण मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी मगो पक्षाचे २ आमदार पळवले आणि श्री. सुदिन ढवळीकर यांना मंत्रीमंडळातून काढले. अशा विश्वासघातकी पक्षासमवेत मगोप युती करूच शकत नाही, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.