चीनचा नवीन कायदा आणि भारताची सुरक्षा !
१. शेजारी राष्ट्रांवर दादागिरी करण्यासाठी चीनने नवीन कायदा करणे आणि त्याच्या कह्यातील भूमीवर त्याचेच नियंत्रण रहाणार असून ती भूमी कोणत्याही राष्ट्राला परत केली जाणार नसणे
‘चीनने नवीन कायदा केला आहे. त्याप्रमाणे त्याच्या कह्यात असलेल्या भूमीवर त्याचेच नियंत्रण राहील आणि चीनकडे असलेली भूमी कुठल्याही राष्ट्राला परत केली जाणार नाही. अशा प्रकारचे अनेक कायदे चीनने संमत केले आहेत. हे कायदे जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत. भारत आणि चीन यांची भूमीस्तरावरील सीमा अनुमाने ४ सहस्र किलोमीटर एवढी आहे. ही सीमा भारताच्या अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि पूर्व लडाख या राज्यांना लागून आहे.
नवीन कायद्याप्रमाणे चीन अनेक गोष्टी करत आहे. चीन त्याच्या सीमावर्ती भागामध्ये दळणवळणाच्या अनेक गोष्टी करत आहे. एवढेच नाही, तर त्याने सीमेवर ६५० ते ७०० नवीन गावे वसवली आहेत. हा कायदा करण्यामागे चीनची दादागिरीच आहे. ‘चीनने कायदे करावेत आणि ते कायदे सर्व जगाने मानावेत’, असे चीनला वाटते. पूर्वी चीनचे १४ देशांशी सीमाविवाद होते. त्यापैकी १२ देशांशी असलेले सीमाविवाद संपलेले आहेत. केवळ भारत आणि भूतान या २ देशांशी असलेले सीमाविवाद आजही चालू आहेत.
अलीकडेच आलेल्या एका वृत्ताप्रमाणे, चीनने भूतानशी एक करार केला आहे. त्याप्रमाणे येत्या काही मासांमध्ये चीन आणि भूतान यांच्यातील अंतिम सीमा ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर हा सीमाविवाद संपेल. चीनच्या म्हणण्याप्रमाणे भूतानची सीमा ठरवण्यात येईल आणि चीन सांगेल ती भूमी भूतानला द्यावी लागेल. त्यानंतर हा भूमीविवाद संपेल. चीनची ही दादागिरी अत्यंत दु:खदायक आहे. या गोष्टीचा भारताच्या सुरक्षेवर नक्कीच परिणाम होणार आहे. चीन सरकारने केलेल्या कायद्यांना त्यांच्या देशात कधीच विरोध होत नाही. चीन जे करतो, ते चिनी लोक मुकाट्याने ऐकून त्याचे पालन करतात.
२. चीन त्याच्याकडील प्रदेश परत करणार नसल्याने भारताला धोका निर्माण होण्याची शक्यता असणे
भारताचा अक्साई चीन हा भूप्रदेश चीनच्या कह्यात आहे. चीन तो कधीही परत करणार नाही. पुष्कळ वर्षांपूर्वी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरचा एक भूभाग चीनला आंदण दिला आहे. हा भागही चीन भारताला परत करणार नाही. चीनने ज्या ४ ठिकाणी घुसखोरी केली होती, त्यातील पेंन्गाँग सो कालवा आणि गलवान येथून त्यांचे सैन्य परत गेले आहे; परंतु हॉट स्प्रिंग आणि डेपसांग येथील भागातून ते अद्याप परत गेलेले नाहीत. तेथे त्यांनी आजही घुसखोरी केलेली आहे. अशा अवस्थेत ते परत जातील का ? याविषयी कुणी काहीही सांगू शकत नाही. चीनच्या या दादागिरीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताला सिद्ध रहावे लागेल. यासाठी भारतीय सैन्य सदैव सिद्ध आहे.
३. भारताला घाबरवण्यासाठी चीनची ‘फ्री वॉर स्ट्रॅटेजी’ (युद्धमुक्त धोरण) !
चीनची ‘फ्री वॉर स्ट्रॅटेजी’ (युद्धमुक्त धोरण) ही एक प्रसिद्ध युद्धनीती आहे. त्या माध्यमातून तो सर्व देशांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीमध्ये चीन भारताशी ‘अपप्रचार युद्ध’, ‘मानसिक युद्ध’ आणि ‘कायदेशीर युद्ध’, असे तीन प्रकारचे युद्ध करतो. याचा अर्थ सगळीकडे प्रचार करायचा की, आम्ही अशा प्रकारचा कायदा संमत केला आहे. त्यानंतर शेजारी देशांवर दबाव टाकायचा की, आम्ही जे म्हणतो, ते तुम्ही मुकाट्याने ऐका. आम्हाला तुमच्याकडून जो भाग हवा, तो तुम्ही आम्हाला मुकाट्याने परत करा. कायद्याचे युद्ध, म्हणजे कुठला तरी पुरावा काढायचा. भारताचा अरुणाचल प्रदेश हा चीनच्या दक्षिण तिबेटचा भाग कसा आहे, हे सांगायचे अन् तो परत घेण्यासाठी दबाव टाकायचा. अशा प्रकारे प्रयत्न करून चीन भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करील. तरीही भारताला घाबरण्याचे कारण नाही; कारण भारताचे सैन्य देशाचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. येणार्या काळात धोका निर्माण झाला, तर भारतीय सैन्य चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी १०० टक्के सिद्ध आहे.
४. चिनी साहित्यावर बहिष्कार घालूया !
‘भारतीय व्हा, भारतीय खरेदी करा !’ सण-उत्सवामध्ये सर्वांनी ‘आम्ही कुठलाही चिनी साहित्य खरेदी करणार नाही आणि भारतात निर्माण झालेल्या वस्तूच खरेदी करणार’, असा ठाम निश्चय करा. तसे झाल्यास चीनला प्रचंड नफा कमावता येणार नाही. सर्व भारतियांनी एकत्रितपणे चिनी साहित्यावर बहिष्कार घालूया.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.