जेव्हा आपले ध्येय स्पष्ट असते, तेव्हा कार्याला दिशा प्राप्त होते ! – भानुदास धाक्रस, राष्ट्रीय महासचिव, विवेकानंद केंद्र
यवतमाळ, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – जेव्हा आपले ध्येय स्पष्ट असते, तेव्हा कार्याला दिशा प्राप्त होते. ध्येयमार्ग पक्का झाला की, श्रेष्ठतेच्या मार्गावर पुढे जाऊन यश प्राप्त करू शकतो. जेथे विवेक असतो, तेथे आनंद असतो. जेव्हा जेव्हा भारत एक होतो, तेव्हा तेव्हा भारत विजयी होतो, असे बहुमूल्य मार्गदर्शन विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय महासचिव श्री. भानुदास धाक्रस यांनी केले. ते भावे मंगल कार्यालय येथे नुकत्याच झालेल्या विवेकानंद शिलास्मारक निर्मितीच्या सुवर्णजयंती वर्षानिमित्ताने ‘एक भारत विजयी भारत’ महासंपर्क अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.
या वेळी ते म्हणाले की, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या शिलास्मारकाला तेथील ख्रिस्त्यांचा तीव्र विरोध होता. यवतमाळ येथील एकनाथ रानडे आणि तत्कालीन खासदार लोकनायक बापू अणे यांनी शिलास्मारकासाठी ३२५ खासदारांच्या स्वाक्षर्या असलेला प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे दिला, तसेच प्रत्येक राज्याकडून १ लाख रुपये आणि १ टक्का भारतियांकडून प्रत्येकी १ रुपया याप्रमाणे आर्थिक निधी गोळा केला. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे स्मारक ६ वर्र्षांत पूर्ण झाले.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी शिवपार्वती मोटर्सचे संचालक आणि सुप्रसिद्ध उद्योजक श्री. राजूभाऊ निवल म्हणाले की, १७ व्या शतकात जगाच्या उत्पन्नामध्ये भारताचा २७ ते ३२ टक्के वाटा होता; आज तो दीड टक्का आहे; कारण भारतीय आध्यात्मिक आणि वैचारिकरित्या भरकटले आहेत. भारतियांनी स्वदेशीचा त्याग करून पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केला आहे. मी ९० देशांत भ्रमण केले असून प्रत्येक देशात त्यांची मातृभाषा प्रकर्षाने दिसून आली; मात्र भारतामध्ये इंग्रजीला अवास्तव महत्त्व दिले जाते. जे मातृभाषेचा सन्मान करू शकत नाहीत, ते प्रगती करू शकत नाहीत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. विजय कावलकर यांनी जीवनामध्ये बाहेरील शुद्धतेसह मनाची शुद्धता आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाकरिता स्थानिक विवेकानंद केंद्राचे नगर संचालक जगदीशजी शर्मा, नगर संयोजक प्रा. सुरेंद्रजी नार्लावार, तसेच पंकज वसानी, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. शास्त्रीकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ता श्री. भानुदास धाक्रस यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रेय फोकमारे आणि सनातन संस्थेचे प्रा. अनंत अट्रावलकर उपस्थित होते. |