नंदुरबार येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट !
बायोडिझेल, गुटखा, मद्य आणि रेशन तस्कर यांचे यंत्रणांना उघड आव्हान !
विशेष प्रतिनिधी, नंदुरबार
नंदुरबार – नंदुरबार हा जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेश यांच्या सीमावर्ती भागात वसलेला जिल्हा आहे. गुजरात राज्यात मद्यबंदी असल्याने शेजारील मध्यप्रदेशमधून नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी होते. महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटखा तस्करी होते. त्यातच भर म्हणजे बायोडिझेल (बायोडिझेलच्या नावाने विक्री होणारे घातक रसायन) माफियांचाही सुळसुळाट होत आहे. जिल्हा प्रशासनाने ६० दिवसांत ६० सहस्र लिटर बायोडिझेल जप्त केले. बायोडिझेल, गुटखा, मद्य आणि रेशन तस्कर यांनी विविध गुन्हे केले आहेत. (अशांवर पोलीस कारवाई कधी करणार ? – संपादक)
नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मद्य आणि गुटखा तस्करी !
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ३ पडताळणी नाके पार करून नंदुरबार येथे प्रतिदिन मद्य आणि गुटखा यांची तस्करी होते. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्याच्या क्षेत्रांतून ही वाहने मार्गक्रमण करतात. (राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा यांना ही तस्करी दिसत कशी नाही ? का ते आंधळेपणाची भूमिका घेतात ? – संपादक) ज्या वेळी प्रसारमाध्यमांत वृत्त येते अथवा अवैध तस्करीविरुद्ध कुणी आवाज उठवला, तरच पोलीस जुजबी कारवाई करून मोकळे होतात. (यावरून या तस्करीला कुणाचा पाठिंबा आहे, ते उघड होते. – संपादक)
बायोडिझेल नावाने घातक रासायनिक पदार्थांच्या विक्रीची मोठी यंत्रणा कार्यरत !
नंदुरबार जिल्ह्यातून २ महामार्ग जातात. तेथे बायोडिझेल विक्रीची मोठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. तेथे बिनबोभाट बायोडिझेलची विक्री चालू असते. बायोडिझेलच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने कोणत्याही मार्गदर्शक सूचना काढलेल्या नाहीत. नंदुरबार जिल्ह्यात कुठलाही रसायन निर्मितीचा कारखाना नसतांना इतक्या मोठ्या प्रमाणात हा रासायनिक पदार्थ जिल्ह्यात कसा उपलब्ध होतो, हे पहायला हवे; मात्र पोलीस यंत्रणा किंवा महसूल विभाग त्याच्या मुळाशी जात नाही. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचेही म्हटले जाते.
पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे कारवाईचे आदेश !
गुटखा तस्करांनी महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर गुजरात राज्याच्या क्षेत्रात मोठी गोदामे घेतली असून तेथून गुटका तस्करी चालू असते. (अन्न आणि औषध प्रशासन, तसेच पोलीस यंत्रणा यावर कारवाई करत नसल्याने यातूनच त्यांची उदासीनता दिसून येते. – संपादक) जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी. पाडवी आणि जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी बायोडिझेल आणि इतर तस्कर यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. (या आदेशाला केराची टोपली दाखवली जाऊ नये, यासाठी संबंधितांनी पाठपुरावा घ्यावा ! – संपादक)