अमरावती येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांचे संपर्क अभियान !
अमरावती – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या येथे झालेल्या संपर्क अभियानाला हिंदुत्वनिष्ठ, संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हिंदु जनजागृती समितीचे कार्य समाजोपयोगी ! – पू. संतोषकुमार महाराज, शिवधारा आश्रम
हिंदु जनजागृती समिती सध्या करत असलेले कार्य समाजोपयोगी असून आम्हीसुद्धा समितीच्या नियमित संपर्कात राहून समवेत कार्य करू. हलाल प्रमाणपत्राविषयी अमरावती येथील व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना याविषयी जागृत करू. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. समितीच्या कार्याला माझे आशीर्वाद आहेत. श्री. सुनील घनवट यांना भेटून मला विशेष आनंद झाला.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला सहकार्य करणार ! – नरेंद्र भारानी, प्रतिष्ठित व्यावसायिक
सनातन संस्थेचे संत (दिवंगत) पू. रत्नाकर मराठे माझ्याकडे यायचे. (तेव्हा पू. मराठे यांना संत म्हणून घोषित केलेले नव्हते.) तेव्हापासून मी संस्थेच्या संपर्कात आहे. त्यांचे बोलणे आणि नम्रपणा मला पुष्कळ आवडायचा. सनातन संस्थेचे ग्रंथ घेण्यासाठी मी इतरांना प्रोत्साहित करीन आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यालाही सहकार्य करीन. (त्यांनी सनातन संस्थेच्या संपूर्ण इंग्रजी ग्रंथांची मागणी केली आहे.)
हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्ट्र निर्मितीचे कार्य ही काळाची आवश्यकता ! – चंद्रकुमारजी जाजोदिया, प्रतिष्ठित व्यावसायिक आणि हिंदुत्वनिष्ठ
भावी पिढीला देशात सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे, ती काळाची आवश्यकता आहे. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला मी यथाशक्ती साहाय्य करीन.
हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात जनजागृतीसाठी प्रयत्न करणार ! – तुलसीजी सेठीया, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय सिंधू सभा
हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी अमरावती येथील व्यावसायिकांची बैठक आयोजित करीन आणि ‘लव्ह जिहाद’चे भयावह वास्तव समाजाला कळावे, यासाठी कार्यक्रम आयोजित करणार आहे. (या वेळी श्री. सुनील घनवट यांचा त्यांनी सत्कार केला.)
हिंदु राष्ट्र येण्यासाठी सर्वांचे प्रयत्न होणे आवश्यक ! – सुप्रसिद्ध आधुनिक वैद्य अविनाश चौधरी, अमरावती
काळाची आवश्यकता लक्षात घेता आदर्श समाजव्यवस्था असलेले हिंदु राष्ट्र येण्यासाठी सर्वांचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करीन. माझ्यासाठी काही सेवा असल्यास नक्की सुचवा. (आधुनिक वैद्य श्री. अविनाश चौधरी यांचा सामाजिक, धार्मिक कार्यांत सहभाग असतो. सनातनच्या ग्रंथांचा संपूर्ण संच त्यांनी स्वतःसाठी मागवून घेतला.)
हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून महाविद्यालयातील युवक-युवतींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण आणि व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा यांचे आयोजन करणार ! – भास्कर टोंपे आणि विजय टोंपे, संचालक, टोंपे महाविद्यालय, चांदूरबाजार, जिल्हा अमरावती
महाविद्यालयातील युवतींसाठी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा अशा २ कार्यशाळा हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून आयोजित करण्याची इच्छा आहे. (श्री. भास्कर आणि श्री. विजय टोंपे हे प्रतिवर्षी विद्यार्थ्यांसाठी सनातन संस्थेच्या वह्या मोठ्या संख्येने खरेदी करतात. ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची माहिती दिल्यावर त्यांनी स्वतःच्या महाविद्यालयात ग्रंथ ठेवण्याविषयी इच्छा व्यक्त केली आणि इतर महाविद्यालयांमध्येही ग्रंथ ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांना साधनेविषयीची आवड असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी श्री. सुनील घनवट यांनी त्यांना रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट देण्याचे निमंत्रण दिल्यावर त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त केली.)
हिंदु मानबिंदूंवर होणार्या आघातांच्या विरोधात संघटित प्रयत्न करण्याचा निश्चय !हिंदुत्वनिष्ठांच्या झालेल्या बैठकीत हिंदु धर्मावर होणार्या विविध आघातांविषयी चर्चा करण्यात आली. त्या वेळी हलाल प्रमाणपत्र, लव्ह जिहाद, सणासुदीच्या कालावधीत विज्ञापनांमधून होणारे विडंबन आदी आघातांच्या विरोधात अमरावती येथे संघटित प्रयत्न करण्याचा संकल्प उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी केला. या वेळी अखिल भारत ब्राह्मण महासभेचे विदर्भ अध्यक्ष श्री. रमेश छांगानी, जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक दुबे, श्री. व्यास, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रकाश सिरवानी, श्री. जय आहुजा, श्री. शैलेंद्र मेघवानी हे उपस्थित होते. |
१६ ग्रंथालयांत सनातनचे ग्रंथ देण्यासाठी निधीचे प्रयोजन केले ! – आमदार रवी राणा
समितीचे समन्वयक नियमित मला भेटतात. माझ्यापर्यंत आलेल्या विषयांना मी नेहमी सकारात्मक प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या निधीमधून ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या अंतर्गत सनातनचे मोठ्या संख्येने ग्रंथ १६ ग्रंथालयांना देण्यासाठी जिल्हा निधी नियोजन विभागाला पत्र पाठवले आहे.