समाजातील अधिकाधिक जण साधनेकडे वळावेत आणि ‘साधकांची पुढील टप्प्याची साधना व्हावी’, अशी तीव्र तळमळ असणार्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी दळणवळण बंदीच्या काळात केलेले विशेष प्रयत्न !
‘संतांच्या सहवासाविषयी संत सेना महाराज यांचा एक अभंग आहे, ‘संत संगतीने थोर लाभ झाला । मोह निरसला मायादिक ।।’ अशीच काहीशी अनुभूती सोलापूर येथील सेवाकेंद्रात रहाणार्या साधकांनी घेतली. कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी लागू करण्यात आली. या कालावधीत सेवाकेंद्रातील साधकांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा प्रदीर्घ सहवास लाभला आणि त्यांच्यातील विविध गुणांचे दर्शन झाले.
१. ‘समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी साधना करावी’, याची सद्गुरु स्वातीताईंना असलेली तळमळ
१ अ. दळणवळण बंदीच्या काळात सद्गुरु स्वातीताईंनी वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी इत्यादींसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग आणि प्रवचने घेऊन त्यांना साधना करण्यासाठी उद्युक्त करणे : दळणवळण बंदीमुळे साधकांचे सेवेसाठी समाजात जाणे, प्रसार करणे आदी सेवा बंद झाली होती. तेव्हा सद्गुरु स्वातीताईंनी कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील वाचक, हितचिंतक, तसेच धर्मप्रेमी यांच्या साधनेसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग अन् प्रवचने घेण्यास प्रारंभ केला. त्यांनी युवा साधक, साधकांचे कुटुंबीय, तसेच समाजातील शिक्षक, आधुनिक वैद्य, अधिवक्ते, अभियंते इत्यादींसाठी ‘ऑनलाईन’ प्रवचने आणि सत्संग घेऊन त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. ‘आपत्काळाला प्रारंभ झाला असल्याने अधिकाधिक लोकांपर्यंत साधनेचा विषय पोचून लोकांनी साधना चालू करावी’, अशी तीव्र तळमळ त्यांना वाटत होती.
१ आ. सद्गुरु स्वातीताईंनी घेतलेल्या ‘ऑनलाईन’ प्रवचनांमुळे अनेकांना साधनेचे महत्त्व पटून त्यांच्यासाठी नियमित ‘साधना सत्संग’ चालू होणे : दळणवळण बंदीच्या भीषण काळात आत्मविश्वास गमावत चाललेल्या समाजातील जिज्ञासूंना सद्गुरु स्वातीताईंच्या मार्गदर्शनामुळे पुष्कळ आधार वाटत होता. भविष्यातील विविध चिंतांनी त्रस्त झालेल्या व्यक्तींना त्यांनी साधना सांगून दिशा दिली. त्यामुळे अनेक जण साधना करू लागले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी घेतलेल्या ‘ऑनलाईन’ प्रवचनांमुळे अनेक वाचक आणि साधकांचे कुटुंबीय यांना साधनेचे महत्त्व पटले आणि त्यांच्यासाठी नियमित ‘ऑनलाईन’ ‘साधना सत्संग’ चालू झाले.
२. साधकांना प्रेम देऊन त्यांना घडवणार्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !
२ अ. सणांच्या कालावधीत सद्गुरु स्वातीताईंनी सेवाकेंद्रात भावपूर्ण वातावरणात सण साजरे करणे, रक्षाबंधनाच्या दिवशी सद्गुरु स्वातीताईंनी स्वतः साधकांचे औक्षण केल्याने साधकांची भावजागृती होणे : दळणवळण बंदीच्या कालावधीत सेवाकेंद्रात रहाणार्या साधकांना घरी जाता येत नसल्याने ‘त्यांना घरची आठवण येऊ नये’; म्हणून सद्गुरु स्वातीताई देवतांची सामूहिक आरती करणे, देवतांची भजने लावणे, तसेच साधकांसाठी गोड पदार्थ बनवणे, असे सर्व करायच्या. त्यामुळे सेवाकेंद्रातील वातावरण उत्साही आणि आनंदी होऊन साधकांना आध्यात्मिक स्तरावर सण साजरा केल्याचा आनंद मिळायचा. रक्षाबंधनाच्या दिवशी सद्गुरु स्वातीताईंनी सर्व साधकांना स्वतः खाऊ दिला आणि ओवाळले. त्या वेळी ‘देवीस्वरूप सद्गुरु स्वातीताई ओवाळत आहेत’, असा भाव जागृत होऊन सर्वांच्याच डोळ्यांत भावाश्रू आले.
२ आ. सद्गुरु स्वातीताईंमुळे साधकांचे नामजपादी उपाय करण्याचे गांभीर्य वाढणे : सद्गुरु स्वातीताई साधकांसमवेत नामजप आणि मंत्रजप करत असल्यामुळे साधकांचे व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले अन् त्यांचे नामजपादी उपाय नियमितपणे होऊ लागले. (सद्गुरु स्वातीताईंना पाठदुखीचा त्रास असल्याने त्यांना एका जागी अधिक वेळ बसून नामजप करता येत नाही. त्यामुळे त्या चालत चालतही नामजप करतात.)
२ इ. सद्गुरु स्वातीताईंनी साधकांना स्वभावदोषांची जाणीव करून त्यांच्या निर्मूलनासाठी दिशा देणे : सद्गुरु स्वातीताईंनी साधकांना सत्संगांतून त्यांच्या स्वभावदोषांची प्रेमाने जाणीव करून दिली आणि स्वभावदोष अन् अहं घालवण्यासाठी दिशाही दिली. त्या वेळी ‘साधकांमध्ये पालट व्हावा आणि त्यांची प्रगती व्हावी’, अशी त्यांची तळमळ होती.
२ ई. सद्गुरु स्वातीताईंनी साधकांना ‘प्रत्येक सेवा माझी आहे’, असा भाव ठेवून सेवा करायला शिकवले.
२ उ. अनेक मास जिल्ह्यातील साधकांना भेटता न आल्याने सद्गुरु स्वातीताईंनी ‘ऑनलाईन’ सत्संगाद्वारे साधकांना मार्गदर्शन करणे : दळणवळण बंदीमुळे जिल्ह्यातील साधकांना अनेक मास भेटता न आल्याची खंत सद्गुरु स्वातीताईंच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी साधकांना ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले. त्यांनी साधकांचे ‘परिवर्तन सत्संग’ चालू केले. या सत्संगांच्या माध्यमातून साधकांचे स्वतःविषयीचे सखोल चिंतन होऊन त्यांनी मनातील सर्व विचार सांगितल्याने साधकांना हलकेपणा जाणवू लागला.
२ ऊ. उत्तरदायी साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणे : सद्गुरु स्वातीताई प्रतिदिन उत्तरदायी साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावाही घेतात. त्या साधकांना विविध संतांच्या भक्तीची उदाहरणे देऊन साधनेविषयी उत्साहाने मार्गदर्शन करतात.
‘सद्गुरु स्वातीताईंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार साधना करून आम्हाला गुरुचरणांपर्यंत लवकर पोचता येऊ दे’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे. ‘विविध गुणांनी युक्त असलेल्या आणि स्वतःच्या कृतीतून साधकांना घडवणार्या सद्गुरु स्वातीताईंचा सहवास आम्हा साधकांना लाभणे’, हे केवळ आमचे भाग्यच आहे ! ‘आम्हाला त्यांचा सहवास लाभला आणि अनेक सूत्रे शिकता आली’, याबद्दल आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– सोलापूर सेवाकेंद्रातील साधक (मार्च २०२१)