तामसुली, खांडोळा येथे गेली ४० वर्षे आदर्शरित्या साजरी केली जात आहे दीपावली !
दीपावलीच्या पूर्वसंध्येला भगवान श्रीकृष्णाचे पूजन, भजन, श्रीकृष्णाच्या हस्ते नरकासुराच्या प्रतिमेचे दहन आणि नंतर श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे विसर्जन करून साजरी होते दीपावली ! – संपादक
खांडोळा – हल्ली दीपावलीच्या पूर्वसंध्येला नरकासुराचा उदोउदो करण्याचे स्तोम माजलेले असले, तरी याला तामसुली, खांडोळा हा गाव अपवाद आहे. या गावात गेली ४० वर्षे दीपावलीच्या पूर्वसंध्येला भगवान श्रीकृष्णाचे पूजन, भजन, श्रीकृष्णाच्या हस्ते नरकासुराच्या प्रतिमेचे दहन आणि नंतर श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे विसर्जन केले जात आहे. गावातील पूर्वजांनी चालू केलेला हा कार्यक्रम अजूनही अव्याहतपणे चालू आहे.
याविषयी अधिक माहिती देतांना तामसुली, खांडोळा येथील रहिवासी श्री. अशोक नाईक म्हणाले, ‘‘गावात नरकासुर प्रतिमा स्पर्धेचे आयोजन केले जात नाही किंवा कुठेही धांगडधिंगा नाही. गावात दीपावलीच्या पूर्वसंध्येचा कार्यक्रम आनंदमय वातावरणात साजरा केला जातो. हा कार्यक्रम झाल्यानंतर अभ्यंगस्नान आणि फराळ असा गावात कार्यक्रम असतो.’’