महाराष्ट्रात विविध गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ५ मंत्र्यांना अटक !

४ मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच !

अटक होणार्‍यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा सर्वाधिक समावेश असणे यावरूनच त्या पक्षाचे खरे स्वरूप उघड होते ! – संपादक 

मनी लॉंडरिंग केसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख याना अटक.

मुंबई – महाराष्ट्राच्या इतिहासात मंत्र्यांना अटक होण्याच्या घटना तशा विरळाच; पण तरीही माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची अटक पहाता आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात ५ मंत्र्यांना अटक झाली. विशेष म्हणजे त्यातील ४ मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत.

खुनाच्या आरोपाखाली पद्मसिंह पाटील होते कारागृहात !

३ जून २००६ या दिवशी कळंबोली (नवी मुंबई) येथे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते पद्मसिंह पाटील यांचे चुलतबंधू अन् काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पवनराजे चारचाकीतून जातांना २ अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात पवनराजे आणि त्यांचा वाहनचालक यांचा मृत्यू झाला. यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) पद्मसिंह पाटील यांना वर्ष २००९ मध्ये अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत. मुंबई येथील सत्र न्यायालयात अजूनही हा खटला चालू आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी छगन भुजबळ २ वर्षे कारागृहात !

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाममंत्री असतांना महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. यामध्ये ‘भुजबळ यांना लाखो रुपयांची लाच देण्यात आली आहे’, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांना २ वर्षे कारागृहात रहावे लागले होते. न्यायालयाने आता त्यांना दोषमुक्त केले असले, तरीही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार असल्याचे सांगितले आहे.

बेदम मारहाणीप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक !

‘घोडबंदर भागात रहाणारे स्थापत्य अभियंता अनंत करमुसे यांचे अपहरण करून त्यांना स्वतःच्या बंगल्यावर आणून पोलिसांकरवी बेदम मारहाण केली’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांना जामीन संमत झाला.

अपशब्द उच्चारल्याने नारायण राणे यांना अटक !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे गुन्हा नोंद झाल्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून अटक करण्यात आली होती. एक दिवसानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता.