वर्ष १९५० आणि १९५१ मधील हळदी-कुंकवाच्या निमंत्रणातून हिंदु संस्कृतीतील लक्षात येणारी काव्यात्मकता आणि रसिकता !

हळदी कुंकुम्

।। श्री दुर्गादेवी प्रसन्न ।।

(चाल – चंद्रकांत राजाची कन्या)

श्रीमंत सौभाग्यवती मम भगिनी आपुल्यासी ।
नमस्कार आजी करूनी करिते एक विनंतीसी ।।

चैत्र मासीचे हळदी कुंकुम् यावे घेण्यासी ।
गोड भेटीचा आपुल्या द्यावा आनंद हो मजसी ।।

हळदी कुंकुम् रेशनमध्ये गेले नच अजूनी ।
म्हणूनी यावे लेकी, सुना आणि मैत्रिणींसह तुम्ही ।।

शुक्रवारी सायंकाळी अगत्य येऊनिया ।
उपकृत मजला करा विनवते श्रीपतीची तनया ।।

हळदी-कुंकू समारंभ : २४.३.१९५०

वेळ : सायंकाळी ५ ते ८

स्थळ : सरदार काळे यांचे बंगल्यात, नव्या पुलानजीक, ३७ शनिवार, पुणे २.

– सौ. लक्ष्मीबाई काळे, सौ. लीलादेवी काळे आणि सौ. सुमनदेवी काळे

 

।। श्री लक्ष्मी-व्यंकटेश प्रसन्न ।।

आम्रतरू फलभारे डुलती वसंत-आगमने ।
वृक्षलतांना नूतन पालवी सुगंधित सुमने ।।

हिंदोळ्यावर बसली देवता पूजू तिला सुमने ।
दर्शनार्थ या सर्व मैत्रिणी आनंद आगमने ।।

– सौ. शांताबाई आपटे आणि सौ. मंगला आपटे, राजगुरुनगर, पुणे. (९.४.१९५१)