सिंहगड रस्ता, धायरी (पुणे) आणि नांदेड फाटा या परिसरात फटाक्यांची अवैध दुकाने
पोलिसांनी केवळ नोटीस बजावली; पण दुकानदारांवर पुढची कारवाई कधी करणार ? तोपर्यंत दुर्घटना घडली तर त्याला कोण उत्तरदायी ? – संपादक
पुणे – महापालिकेने परवाना देतांना मोकळे मैदान आणि आर्.सी.सी. बांधकाम असलेले दुकान, अग्नीशमन दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणि वाहतूक पोलीस यांची अनुमती, तसेच अन्य कागदपत्रे यांची पूर्तता करण्यासह नियम आणि अटी लागू केलेल्या आहेत; परंतु सर्व नियम धाब्यावर बसवत सिंहगड रस्ता, धायरी, नांदेड फाटा या परिसरात जागा दिसेल त्या ठिकाणी फटाक्याची दुकाने (स्टॉल) उभारण्यात आली आहेत. यामुळे अपघाताचा धोका असून ‘यातून दुर्घटना घडली, तर त्याला उत्तरदायी कोण ?’ असे विचारत विनाअनुमती फटाक्याची विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले की, धायरी, सिंहगड रस्ता, नांदेड फाटा या भागांत अवैध फटाक्यांची विक्री करणार्या दुकानांना पोलीस विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. (अशा धोकादायक दुकानांवर थेट कारवाई करणे अपेक्षित नाही का ? – संपादक)